Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Kolhapur › उद्योगांमधील कामगार किती सुरक्षित?

उद्योगांमधील कामगार किती सुरक्षित?

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 1:02AMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले  

अत्यंत धोकादायक पद्धतीने रासायनिक कंपन्या व अन्य उद्योगांमध्ये काम करणार्‍या उद्योगांतील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. सुरक्षिततेच्या  साधनांचा, प्राथमिक उपचार केंद्रांचा अभाव यामुळे हे कामगार असुरक्षितच आहे.

कोल्हापुरात गेल्या महिन्याभरात औद्योगिक कारखान्यांमध्ये झालेल्या दुर्घटनेत तीन कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत.  कामगार आपल्या जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावत असतात. अशावेळी त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी घेणे संबंधित संस्थेचे कर्तव्य असते. उद्योगांकडून नेमक्या या उपाययोजना केल्या जातात की नाही यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या अतंर्गत कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश असून यामध्ये अंदाजे  2 हजार 800 उद्योग कार्यरत आहेत. वीस पेक्षा जास्त कामगार ज्या उद्योगांमध्ये काम करतात अशा उद्योगांना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. रासायनिक कारखान्यांसाठी दर दोन वर्षांनी सेफ्टी ऑडिट करणे बंधनकारक आहे. कामगारांच्या कामाच्या स्वरुपानुसार हॅन्ड ग्लोज, बूट, हेल्मेट तसेच कारखान्यात आग प्रतिबंधक यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. आपत्कालीन स्थितीत बाहेर जाण्याचा मार्ग असणे गरजेचे आहे.  

 कामगारांवर तत्काळ प्रथमोपचार होण्यासाठी कारखान्यात प्राथमिक उपचार केंद्राची गरज असते. ज्या उद्योगांमध्ये 500 पेक्षा जादा कामगार आहेत त्याठिकाणी अशा केंद्राची सोय करणे आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्‍ती करणे बंधनकारक आहे. कोल्हापूर विभागातील 2800 कारखान्यांमध्ये  हजारो कर्मचारी काम करत आहेत. यातील काही कर्मचारी धोकादायक उद्योगांमध्ये काम करत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे उद्योगांच्या संचालकांवर बंधनकारक आहे; पण काही ठिकाणी शासन कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने अपघाताच्या दुर्घटना घडून कामगारांना आपल्या जीवाला मुकावे लागत आहे.

नियमाचे पालन करा, अन्यथा कारवाई : लभाणे

दरम्यान, औद्योगिक क्षेत्रात होणार्‍या दुर्घटनांबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक सी. व्ही. लभाणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,  फॅक्टरी अ‍ॅक्ट 1948 व महाराष्ट्री फॅक्टरी अ‍ॅक्ट 1963 कायद्यानुसार या विभागाचे काम चालते. उद्योगांमध्ये काम करणार्‍या कामगारांच्या सुरक्षेला  औद्योगिक संस्था प्राधान्य देतात की नाही याची पहाणी या विभागामार्फत केली जाते. उद्योगांनी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या असल्या तरी कामगारांकडून त्याचे पालन होणे गरजेचे आहे. जर नियमाचे कोणी उल्‍लंघन करत असेल तर अशा उद्योगांंवर कडक कारवाई करण्याचे संकेत लभाणे यांनी दिले. शिरोली औद्योगिक वसाहतीतील दुर्घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अहवाल मिळाल्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही लभाणे यांनी सांगितले.