Wed, Jul 17, 2019 10:37होमपेज › Kolhapur › लुटारू टोळ्यांची दहशत!

लुटारू टोळ्यांची दहशत!

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 24 2018 10:06PMकोल्हापूर : दिलीप भिसे

घातक शस्त्रांच्या बळावर महामार्ग किंबहुना निर्जन ठिकाणी आडमार्गावर धुमाकूळ घालणार्‍या लुटारू टोळ्यांनी शहरासह ग्रामीण भागात दहशत माजविली आहे. स्थानिक गुंडांना हाताशी धरून टोळ्यांनी इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगलेसह शाहूवाडी, चंदगड परिसरात वाहने रोखून बेधडक ‘लूटमारी’चा फंडा चालविला आहे. या प्रकारामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. ‘वाटमारी’च्या सत्रामुळे सराईतांनी पोलिसांना आव्हान दिल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात काही महिन्यांत लूटमारीच्या पंधरावर गंभीर घटना घडल्या आहेत. त्यात सर्वाधिक आर्थिक झळ शिरोळ, हातकणंगले येथील नागरिकांना सोसावी लागली आहे. घटनांचा अद्याप छडा लागलेला नसताना चौडेंश्‍वरी-शिरोळ व तमदलगे-जैनापूर मार्गावर मध्यरात्रीला सराईतांनी दहशत निर्माण केली आहे.

चॉपर, कोयत्यासह तिखटपुड्याचा वापर करून टोळ्यांनी वेगवेगळ्या घटनांत वाहने रोखून साडेचार लाख रुपयांची रोकड, दागिने असा ऐवज लुटला. दोनही मार्ग कोल्हापूर-सांगली मार्गावरील आहेत. मार्गावर रात्रंदिवस दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहनांची गर्दी असते.  

रात्री उशिरा पहाटेच्या दरम्यान मार्गावर कोकण, कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यांतील वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अलीकडच्या काळातील ‘लूटमारी’च्या घटनामुळे मार्गावरील वाहतूक असुरक्षित बनली आहे. रात्री उशिरा कुटुंबीयासमवेत प्रवास करणेही धोकादायक बनले आहे.

महामार्गासह जिल्ह्यातील निर्जन व आडमार्गावरील रस्त्यावर रात्रंदिवस नाकाबंदी, वाहन तपासणीसाठी स्थानिक पोलिस यंत्रणेला वारंवार सूचना दिल्या जातात. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाचा कागदोपत्री अमल केला जातो. इचलकरंजी-सांगली मार्ग, चिपरी फाटा, कागल, पेठवडगाव, हातकणंगलेजवळील मजल खिंड, सांगली फाटा, मलकापूर मार्गावर आर्थिक कमाईचे ‘शार्टकट वसुली नाके’ चांगलेच परिचित झाले आहेत.

‘चेन स्नॅचिंग’च्या गुन्ह्यातील सराईतांनी आता स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरून झटपट कमाईसाठी महामार्गावर लूटमारीचा धंदा चालविला आहे. काही दिवसांपासून मिळकतीचा हा फंडा चांगलाच फार्मात येऊनही जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अजूनही भानावर आली नाही. कोल्हापूर पोलिस दलाच्यादृष्टीने हा प्रकार खेदजनक म्हणावा लागेल.