Sun, Nov 18, 2018 07:08होमपेज › Kolhapur › कागल शहर येणार ‘सीसीटीव्ही’च्या नजरेत

कागल शहर येणार ‘सीसीटीव्ही’च्या नजरेत

Published On: Apr 16 2018 12:28AM | Last Updated: Apr 15 2018 11:00PMकागल : प्रतिनिधी

कागल शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मदत व्हावी, छोट्या-मोठ्या घटनांना, तसेच छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा, यासाठी शहरातील सर्व भागात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना आता यश येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबरोबरच पोलिसांनी सम-विषम पार्किंगची अंमलबजावणी केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

शहरामध्ये विद्यार्थी, महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, महिलांची छेडछाड, चैन स्नॅचिंग, चोरी, हाणामारी, यासारख्या घटनांना आळा घालण्याकरिता कॅमेर्‍यांची गरज आहे. कागल शहराचे आराध्य दैवत गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरुसामध्ये पालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर अनेक ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यामुळे उरुसाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचीत प्रकार घडला नव्हता. उरूस झाल्यानंतर बसविण्यात आलेले कॅमेरे मात्र प्रायोगिक तत्त्वावर असल्याने ते काढून नेण्यात आलेे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुव्यवस्थेकरिता सध्या कॅमेर्‍यांची गरज निर्माण होऊ लागली आहे. सध्या कागल पोलिस ठाणे, गैबी चौक अशा चार-पाच ठिकाणी या कॅमेर्‍यांची सोय आहे. त्याचे नियंत्रण पोलिस ठाण्यामध्ये आहे. मात्र, असे कॅमेरे संपूर्ण शहरामध्येच बसविण्यात आले, तर नागरिकांची सुरक्षितता वाढणार आहे. त्यासाठी पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पोलिस ठाण्यामध्ये रुजू झाल्यापासून ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यासाठी पाठलाग सुरू केला आहे.

गावात किंवा शहरात कॅमेर्‍यांची गरज का आहे? हे येणार्‍या प्रत्येकाला पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील पटवून देत आहेत. गावागावांतील चौका-चौकांत कॅमेरे बसविण्यासाठी तरुण मंडळांना आवाहन करीत आहेत. त्यांच्या आवाहनाला काही तरुण मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जयंतीमधून आणि उरुसामधून शिल्‍लक राहिलेल्या वर्गणीतून काही गावांतील तरुण मंडळे गावात कॅमेरे बसविण्याच्या तयारीत आहेत. तर शहरातील सर्व पदाधिकारी, व्यापार्‍यांनाही याबाबत विनंती केली जात आहे.