Tue, Mar 19, 2019 12:14होमपेज › Kolhapur › ऐतिहासिक दस्तऐवज धोक्यात...

ऐतिहासिक दस्तऐवज धोक्यात...

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 11:41PMकोल्हापूर : सागर यादव

ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन-संवर्धन आणि संरक्षण करण्याचे महत्त्वाचे काम राज्य शासनाचा पुराभिलेख विभाग करत आहे. नागपूर, मुंबई, पुण्यानंतर पुराभिलेखागाराचे कार्यालय कोल्हापुरात आहे. कोल्हापूर पुराभिलेखागारात शिवकाळापासूनच्या लाखो दस्तऐवजांचा खजिना जतन करण्यात आला आहे. ऐतिहासिक कागदपत्रे असणारे हे ठिकाण असुरक्षित बनले आहे.

प्रवेशद्वारातून आत येताना उजव्या बाजूला बांधण्यात आलेल्या बंद खोलीच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न गेली कित्येक वर्षे ‘जैसे थे’ आहे. पुराभिलेख कार्यालयाने मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करूनही हे अतिक्रमण हटलेले नाही.   

शिवकाळापासून म्हणजेच इसवी सन 1660 पासूनचा म्हणजे तब्बल 400 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास या खजिन्यातील दीड कोटी कागदपत्रांत लपला आहे. यातील बहुतांशी कागदपत्रे ‘मोडी’ लिपीत आहेत. या कागदपत्रांचे जतन-संवर्धन अत्याधुनिक डिजिटल स्कॅनिंग पद्धतीनेही होत आहे. एकीकडे हे सकारात्मक चित्र असताना, दुसरीकडे या अत्यंत महत्त्वाच्या विभागाला विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासले आहे. या इमारतीच्या परिसरात शासनाने विविध प्रकारच्या इतर कार्यालयांना परवानगी दिली आहे. यामुळे या परिसरात लोकांचा राबता वाढला आहे. यामुळे पुराभिलेखागाराच्या सभोवतीचा परिसर अस्वच्छ बनला आहे. 

कचरा, वनस्पतींचे अतिक्रमण झाले आहे. पुराभिलेखागाराकडे असणार्‍या मनुष्यबळाची कमतरता आणि संरक्षण यंत्रणेचा अभाव यामुळे या परिसरात कोणीही ये-जा करत असतो. यामुळे दारुच्या बाटल्या, गुटखा-माव्यांच्या पाकिटांचा कचरा, भटक्या जनावरांचा उपद्रव पाहायला मिळतो.

‘त्या’ खोलीचे अतिक्रमण...

पुराभिलेखागाराच्या प्रवेशद्वारातच करवीर पोलिस ठाण्याने विना परवाना एक खोली बांधली आहे.  ही खोली कशासाठी बांधण्यात आली? याची चौकशी केली असता यात जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यात कारवाईतील दारुच्या बाटल्यांचाही समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. बंद खोलीतील वस्तूंच्या पाहणीबाबत  करवीर पोलिसांकडे विचारणा केल्यास ‘गोपनीयतेचा भंग होतो’ असे उत्तर देवून खोली उघडण्यास नकार दिला जात आहे. वास्तविक अनमोल अशा ऐतिहासिक दस्तऐंवजांचे जतन करणार्‍या इमारतीजवळ  दारुसारख्या ज्वालागृही गोष्टीचा मोठा धोका होवू शकतो. यामुळे ही खोली येथून हाटविण्याची मागणी पुराभिलेखागाराच्यावतीने वारंवार करण्यात आली आहे. याबाबत पुराभिलेखागाराने जिल्हा पोलिस प्रमुख, पोलिस विशेष महानिरीक्षक अशा विविध स्तरावर निवेदन दिले. त्यांच्याकडूनही कारवाई न झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडे दाद मागण्याची वेळ आली आहे.