होमपेज › Kolhapur › हीच ईंती समजून फुलासारखी वर ये... 

हीच ईंती समजून फुलासारखी वर ये... 

Published On: Mar 07 2018 7:49AM | Last Updated: Mar 07 2018 7:49AMकसबा वाळवे : वार्ताहर

‘बोल महाराजा, हीच ईंती  समजून फुलासारखी वर ये’ आपल्या मनात एखादी इच्छा धरून दगडी गुंडी उचलण्याचा धार्मिक विधी चक्रेश्‍वरवाडी (ता. राधानगरी) येथे मंगळवारी पार पडला.

आजच्या आधुनिक युगात अशा प्रकारचा लोकश्रद्धा भक्‍कम करणारा विधी वैज्ञानिक द‍ृष्टिकोनाला विचार करायला लावणारा म्हणावा लागेल. आपल्या इच्छा बोलण्यासाठी माहेरवाशिणी व ग्रामस्थ येथे येतात. 90 किलो वजनाची दगडी गुंडी सभोवती जमून दहा लोक केवळ दोन बोटांनी ही गोल गुंडी उचलतात. जर मनातील इच्छा पूर्ण होणार असेल तर ही गुंडी पाच फूट उंच उचलली जाते. 

पुजारी ‘बोल महाराजा हीच ईंती महाराजा फुलासारखी वर ये’ असे म्हणताच इच्छा पूर्ण होणार असेल तर गुंडी उचलते, अन्यथा नाही अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. हा कार्यक्रम कित्येक वर्षे येथे सुरू आहे. धूलिवंदन सणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. 

धार्मिकतेला आधुनिक विचारांची जोड देत होळी लहान करून शेणी दान उपक्रम राबवण्यात आला. लहान मुलांमध्ये वाद्य वाजवण्यात उत्साह दिसून येत होता. सायंकाळी चिखलफेक, सोंगाड्याचे कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग दिसून येत होता. त्यामुळे सामाजिक एकोप्याबरोबर देवाबद्दलची श्रद्धा दिसून येत होती. गुंडी उचलण्याचा हा धार्मिक कार्यक्रम धूलिवंदन झालेनंतर दहाव्या जागराच्या दिवशी आणि रंगपंचमी दिवशी होतो.