Fri, Apr 19, 2019 07:58होमपेज › Kolhapur › पंचगंगेची मच्छिंद्री

पंचगंगेची मच्छिंद्री

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 19 2018 1:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात बुधवारी पावसाने उघडीप दिली. मात्र, पंचगंगेच्या पातळीत वाढच होत राहिली. दुपारी पंचगंगेची मच्छिंद्री झाली. पाण्याची पातळी 44.5 फुटांवर गेली आहे. राधानगरी धरण भरत आले आहे, त्यातच आणखी तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होण्याचा धोका वाढला आहे. जिल्ह्यातील 191 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर कमी झाला. आज सर्वत्र उघडझाप होती. काही काळ सूर्यदर्शनही झाले. अधूनमधून काही सरी कोसळल्या. मात्र, दिवसभर पावसाने विश्रांतीच घेतली. यामुळे काहीसा दिलासा मिळाला, यामुळे शहरातील जनजीवन काहीसे पूर्वपदावर आले. 

पावसाचा जोर कमी झाल्याने पश्‍चिम भागातील नद्यांच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. तीन बंधार्‍यांवरील पाणी कमी झाले. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मरळी येथे आलेले पाणी कमी झाले. लोंघे येथील पाणीही कमी झाल्याने, सायंकाळनंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील  केर्लीमार्गे होणारी वाहतूक आजही बंद राहिली. केर्ली, आंबेवाडीजवळ पाण्याची पातळी वाढली. आंबेवाडी-चिखली मार्गावरही पाण्याची पातळी आणखी वाढली. यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद झाली. नागरिक पाण्यातूनच ये-जा करत होते.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाणी पातळी कमी होत असली, तरी पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. आज सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी 43.8 फूट होती. दुपारी 12 वाजता पाणी पातळी 44 फुटांवर गेली. दोन वाजेपर्यंत पाणी पातळी स्थिर राहिली. यानंतर पुन्हा पातळीत वाढ होत राहिली. रात्री आठ वाजता पातळी 44.5 फुटांपर्यंत गेली. दरम्यान, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पंचगंगेची मच्छिंद्री झाली. 

पंचगंगेची पातळी वाढत चालल्याने शहरातील नागरी वस्तीजवळही नाल्यांची पाणी पातळी वाढू लागली आहे. शहरातील काही भागांत या नाल्यांचे पाणी शिरू लागले आहे. जिल्ह्यातील इंगळी, रूई, कुरूंदवाड परिसरातही नागरी वस्तीजवळ पाणी आल्याने नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. शहरातील 71 लोकांसह इंगळीतील 15 कुटुंबांतील 75 लोक, रूईतील 3 कुटुंबांतील 13 लोक, तर कुरूंदवाड येथील 7 कुटुंबांतील 32 लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. पंचगंगा धोक्याच्या पातळीवर गेल्याने लोकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील 82 बंधार्‍यांवर अद्याप पाणी आहे. टेकवाडी, बर्की या गावांसह गोठे पुलापलीकडील गावांचा पूर्ण संपर्क तुटलेलाच आहे. या गावांना बसलेला पुराचा वेढा उद्या सायंकाळपर्यंत सैल होण्याची शक्यता आहे. बाजारभोगाव परिसरातही पाणी उतरू लागले आहे. मात्र, अद्याप रस्त्यावर पाणी असल्याने जांभळी खोर्‍यातील संपर्क अद्याप तुटलेलाच आहे.

कसबा बावडा-शिये मार्गावर अद्याप तीन ते चार फूट पाणी आहे. याच पाण्यातून पुण्यातील अरविंद काकडे व विवेक मिश्रा यांनी शिये टोल नाक्याजवळ चारचाकी (एम.एच. 12 जीझेड 3906) पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या पाण्यात गाडी अडकली, त्यातील दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. इचलकरंजी येथे स्मशानभूमी येथे एक जण अडकला होता, त्यालाही टाकवडे येथील आधार संस्थेच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. मुगडेवाडी (ता. पन्हाळा) येथील ज्ञानदेव तुकाराम देवाळकर या वृद्धाला हृदयविकाराचा त्रास जाणवत होता, त्यांना यांत्रिकी बोटीद्वारे आपत्कालीन यंत्रणेने पाटपन्हाळा येथे आणले, तेथून रुग्णवाहिकेतून त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 43.95 मि.मी. पाऊस झाला. गगनबावड्यात 89 मि.मी., आजर्‍यात 79.25 मि.मी. पाऊस झाला. पन्हाळा तालुक्यात 62.57 मि.मी., शाहूवाडीत 56.50 मि.मी., राधानगरीत 57.67 मि.मी., करवीरमध्ये 29.63 मि.मी., कागलमध्ये 21.17 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 19.28 मि.मी., भुदरगडमध्ये 37 मि.मी., चंदगडमध्ये 46.83 मि.मी., हातकणंगलेत 19.87 मि.मी., तर शिरोळ तालुक्यात 8.14 मि.मी. पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रांत गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण परिसरात 151 मि.मी.पाऊस झाला. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, धरणात सध्या 7.82 टी.एम.सी. पाणीसाठा झाला असून, धरण 94 टक्के भरले आहे. धरणातून वीजनिर्मितीसाठी 1,600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तुळशी धरण परिसरात 123 मि.मी.पाऊस झाला. वारणा परिसरात 98 मि.मी. पाऊस झाला. धरणातून विसर्ग आणखी वाढवण्यात आला आहे. सध्या 18 हजार 207 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. दूधगंगा धरण परिसरात 106 मि.मी. पाऊस झाला. कासारी परिसरात 90 मि.मी., कडवी परिसरात 93 मि.मी., कुंभी परिसरात 70 मि.मी., पाटगाव परिसरात 98 मि.मी., चिकोत्रा परिसरात 105 मि.मी., जंगमहट्टी परिसरात 80 मि.मी. पाऊस झाला. जंगमहट्टी धरण 95 टक्के भरले असून, दोन दिवसात हे धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. घटप्रभा परिसरात 159 मि.मी., जांबरे परिसरात 116 मि.मी., तर कोेदे परिसरात 165 मि.मी. पाऊस झाला.