कोल्हापुरात तासभर मुसळधार

Last Updated: Oct 11 2019 1:42AM
Responsive image
कोल्हापूर : शहर आणि परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने सीपीआर चौकात पाणी साचले.

Responsive image

कोल्हापूर : प्रतिनिधी

शहर आणि परिसरात गुरुवारी विजेच्या लखलखाटासह मुसळधार पाऊस झाला. तासभर पावसाचा जोर होता. धुवाँधार पावसाने शहरातील अनेक मार्गांवर पाणी साचले. पावसाने काही काळ जनजीवनावर परिणाम झाला.

गेल्या काही दिवसांपासून दुपारनंतर पाऊस हजेरी लावत आहे. आज दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. सायंकाळी पाचनंतर वातावरण ढगाळ झाले. सातच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. काही वेळात पावसाचा जोर वाढला. काही ठिकाणी पावसाचा जोर इतका होता की, समोरील काही अंतरावरील दिसत नव्हते. पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. काहींनी दुकाने, हॉटेल, टपर्‍या आदी जागा मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला तर काहींनी भिजत जाणे पसंत केले.

पावसाने अनेक रिक्षा थांबे रिकामे झाले. रस्त्यावर रिक्षा मिळत नव्हत्या. केएमटीच्या वेळापत्रकावरही काहीसा परिणाम झाला. शहरात आलेल्या भाविक, पर्यटकांची त्रेधातिरपिट उडाली. शहराच्या प्रमुख बाजारपेठा, व्यापारी पेठातही व्यावसायिकांची पावसाने दैना उडवली. निवडणूक प्रचारावरही पावसाने पाणी फिरवले. काही उमेदवारांना रात्रीच्या कोपरा सभा, पदयात्रा रद्द कराव्या लागल्या.

जोरदार पावसाने गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. अनेक गटारींना नाल्याचे स्वरूप आले होते. शहराच्या अनेक भागांत पाणी साचले. ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, परीख पूल, जनता बझार चौक, व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, सीपीआर चौक, जयंती नाला पूल आदी अनेक ठिकाणी पाणी साचले. सीपीआर चौक व जयंती नाला पुलावर निम्मा रस्ता पाण्याने व्यापून गेला होता.

पावसाने जयंती नाला दुथडी भरून वाहत होता. सुमारे तासभर झालेल्या पावसाने जयंती नाल्याची पाणी पातळी दोन ते अडीच फुटांनी वाढली. तासाभराने पावसाने विश्रांती घेतली. मात्र विजेचा लखलखाट आणि ढगाळ वातावरण कायम होते. रात्री उशिरापर्यंत हवेत गारठा होता.