Wed, Jul 17, 2019 16:00होमपेज › Kolhapur › संततधार; पंचगंगेला पूर

संततधार; पंचगंगेला पूर

Published On: Jul 13 2018 1:23AM | Last Updated: Jul 13 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात गुरुवारी धुवाँधार पाऊस झाला. दिवसभर सुरू असलेल्या संततधारेने पंचगंगेसह अनेक नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेल्याने 100 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. आजरा तालुक्यात बंधार्‍यावरून शेतकरी वाहून गेला, तर पन्हाळा तालुक्यात शेततळ्याची भिंत अंगावर पडून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. पंचगंगेचे पाणी इशारा पातळीकडे वाढत चालली आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना तसेच शासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, राधानगरी धरणातून 1600 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पाऊस कोसळत होता. शहर आणि परिसरात पावसाचा जोर होता. अधूनमधून पावसाचा जोर इतका वाढत होता की, काही अंतरावरीलही दिसत नव्हते, अशी परिस्थिती होती. पावसाने शहरातील जनजीवनावर परिणाम जाणवला. शहरातील अनेक भागात पाणी साचले. दिवसभर सुरू असलेल्या पावसाने शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयातील उपस्थिती तुलनेने कमी होती. अनेकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.

जिल्ह्यात पावसाचा जोर प्रचंड होता. जिल्ह्यात बहुतांशी सर्वत्र अतिवृष्टी झाली. जोरदार पावसाने नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. बहुतांशी सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीलाही पूर आला आहे. पंचगंगेचे पाणी गुरुवारी रात्री गंगावेस-शिवाजी पूल या रस्त्यापर्यंत आले होते.

पंचगंगा इशारा पातळीकडे

पंचगंगेची पाणीपातळी सकाळी सहा वाजता 31.8 फुटांवर होती. सकाळी नऊ वाजता ती 32 फूट झाली. यानंतर दुपारी चार वाजता पाणी पातळी 33 फुटांवर गेली. यानंतर मात्र पाणीपातळी वेगाने वाढत गेली. सहा वाजता पाणी पातळी 33.6 फुटांवर गेली. सायंकाळी सात वाजता पातळी 34 फुटांपर्यंत गेली. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे, 
पावसाचा जोर कायम राहिला, तर शुक्रवारी पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाने अणुस्कुरा घाटात दरड कोसळली. यामुळे कोल्हापूर-राजापूर मार्गावरील वाहतूक दिवसभर बंद राहिली. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. कुंभी नदीवरील गोठे पुलावर दुपारी पाणी आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावर असलेल्या दीड-दोन फूट पाण्यातून नागरिकांची धोकादायक ये-जा सुरू होती. सुळे धरणावरही पाणी आल्याने या परिसरातील गोठे, गोटमवाडी, तांदूळवाडी, आकुर्डे, पणुत्रे, आंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी या गावांचा पूर्ण संपर्क तुटला आहे.

49 बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत 32 बंधारे पाण्याखाली गेले होते. नद्यांच्या पातळीत वाढ होत गेल्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत आणखी 17 बंधारे पाण्याखाली गेले. जिल्ह्यातील एकूण 49 बंधारे पाण्याखाली गेल्याने सुमारे 100 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एस. टी. बस वाहतुकीच्याही काही फेर्‍यांवर परिणाम झाला असून, सहा मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

वृद्ध वाहून गेला, भिंत कोसळून एक ठार
 

आजरा तालुक्यातील सुळेरान बंधार्‍यावरून शंकर लक्ष्मण कुराडे (वय 75, रा. बेळगुंडी, ता. आजरा) हे सकाळी दहाच्या सुमारास वाहून गेले. शेताकडे जाताना ही दुर्घटना घडल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले. त्यांचा उशिरापर्यंत शोध सुरू होता. पन्हाळा तालुक्यातील बोरगाव येथे शेततळ्याची भिंत अंगावर कोसळून श्रीपती ज्ञानू चौगुले (वय 55) या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. वैरण आणण्यासाठी गेलेल्या श्रीपती यांच्या अंगावर भिंत कोसळून त्या ढिगार्‍याखाली ते गाडले गेले, त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस आणि नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने होणारी वाढ या पार्र्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. कक्षातील कर्मचार्‍यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. यासह नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी तसेच पूरस्थिती निर्माण होणार्‍या परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे, अशाही सूचना त्यांनी केल्या. पूरस्थितीवर लक्ष ठेवावे, आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, कोणत्याही प्रकारे जीवितहानी होणार नाही यासाठी दक्ष रहावे, अशा सूचनाही त्यांनी सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना दिल्या.

गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 37.15 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली. तिथे 91 मि.मी. पावसाची नोंद झाली. शाहूवाडीत 57 मि.मी., भुदरगडमध्ये 55 मि.मी., राधानगरीत 47 मि.मी., चंदगडमध्ये 37 मि.मी., पन्हाळ्यात 32 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 23 मि.मी., कागलमध्ये 21 मि.मी., करवीरमध्ये 19 मि.मी., हातकणंगलेत 5 मि.मी., तर शिरोळमध्ये 4 मि.मी.पावसाची नोंद झाली.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच आहे. गेल्या 24 तासांत जंगमहट्टी वगळता सर्वच धरणांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण परिसरात 125 मि.मी., कडवी परिसरात 112 मि.मी., कुंभी परिसरात 130 मि.मी., पाटगाव परिसरात 142 मि.मी., चिकोत्रा परिसरात 110 मि.मी., चित्री परिसरात 102 मि.मी., घटप्रभा परिसरात 109 मि.मी., जांबरे परिसरात 121 मि.मी., तर कोदे धरण परिसरात 215 मि.मी. पाऊस झाला. तुळशी परिसरात 73 मि.मी., वारणा परिसरात 74 मि.मी., दूधगंगा परिसरात 84, तर कासारी परिसरात 79 मि.मी.पाऊस झाला. जंगमहट्टी धरण परिसरात 45 मि.मी.पाऊस झाला.