Sun, May 19, 2019 14:31
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : धरण परिसरात धुवाँधार; राधानगरीचे ४ दरवाजे खुले

कोल्हापूर : धरण परिसरात धुवाँधार; राधानगरीचे ४ दरवाजे खुले

Published On: Aug 19 2018 1:45AM | Last Updated: Aug 19 2018 1:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शहर आणि परिसरात पावसाची उघडीप असली, तरी जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात दमदार पाऊस सुरू आहे. धरण परिसरात शनिवारी धुवाँधार वृष्टी झाली. यामुळे राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा खुला झाल्याने चार दरवाजांतून विसर्ग सुरू आहे. चिकोत्रा वगळता सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पाणी पातळीत वाढ होत चालल्याने दहा नदीवरील 45 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू असून, सुमारे 100 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. जिल्ह्याच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शहर आणि परिसरात शनिवारी पावसाने विश्रांती घेतली. काही काळ सूर्यदर्शनही झाले. ऊन-पावसाचा हा खेळ सुरू असताना जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात विशेषत: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील नऊ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे धरणातून होणारा विसर्गही वाढवला जात आहे.

वारणा धरणातून 5,780 क्युसेक विसर्ग होत होता, तो आता 10 हजार 616 क्युसेक इतका वाढला आहे. दूधगंगेतील विसर्ग पाच हजारांवरून 6 हजार 500 क्युसेकपर्यंत नेण्यात आला आहे. दुपारी दूधगंगा धरणातील विसर्ग आणखी वाढवून आठ हजार क्युसेक इतका करण्यात आला. धरणातील विसर्गामुळे भोगावती, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा नदीतील पाणी पातळीत वाढ होत आहे. कोयना धरणातूनही 35 हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पातळीत वाढ सुरू आहे. त्याचा परिणाम पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगेच्या पातळीवर होत असून, त्यांची पाणी पातळी वाढतच चालली आहे.

पंचगंगेची पाणी पातळी शुक्रवारी सकाळी 29 फुटांपर्यंत कमी झाली होती. ती पुन्हा वाढू लागली असून, शनिवारी सकाळी आठ वाजता ती 31.6 फुटांपर्यंत गेली होती. दुपारी दोन वाजता पंचगंगेची पाणी पातळी 31.8 फुटांपर्यंत वाढली. धरण परिसरात पाण्याचा विसर्ग वाढल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला, तर दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती बिकट होण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 23.88 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस झाला. राधानगरीत 46.50 मि.मी., शाहूवाडीत 35.83 मि.मी., भुदरगडमध्ये 31.40 मि.मी.,  चंदगडमध्ये 22 मि.मी., कागलमध्ये 21 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 15 मि.मी., करवीरमध्ये 13 मि.मी. पावसाची नोंद झाली. हातकणंगलेत तीन तर शिरोळमध्ये एक मि.मी.पाऊस झाला.

राधानगरी धरण परिसरात दोन दिवस अतिवृष्टी

राधानगरी प्रतिनिधी कळवितो की, गेल्या दोन दिवसांपासून राधानगरीसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची अतिवृष्टी सुरू आहे. शनिवारी पहाटे चौथ्या क्रमांकाचा दरवाजा खुला झाला आहे. सध्या धरणाचे चार दरवाजे सुरू असून त्यातून 5 हजार 752, तर वीजगृहातून 1600 असे एकूण 7,312 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. त्यामुळे भोगावती नदीच्या पाणीपतळीत कमालीची वाढ झाली असून, नदीवरील आणखी दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राऊतवाडी धबधब्याकडे जाणार्‍या रस्त्यावरील पडळी पुलावर पहिल्यांदाच अर्धा फूट पाणी आले असून, या पाण्यातूनच पर्यटक कसरत करीत धबधब्याकडे जात आहेत.

यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात तुलनेत जवळपास दीड हजार मि.मी. इतका जादा पाऊस नोंद झाला आहे. जुलैच्या 20 तारखेनंतर 13 ऑगस्टनंतर शुक्रवार दि. 17 पर्यंत दोन दरवाजे सतत खुले आहेत. दोन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असल्याने शनिवारी पहाटे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुन्हा चार व सहा क्रमांकाचे दोन दरवाजे उघडले आहेत. गेल्या दशकात सर्वाधिक वेळा व दीर्घकाळ विसर्ग सुरू राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदा आजअखेर 4405 मि.मी. पाऊस नोंदला असून, धरणाची पातळी 357.50 इतकी आहे, तर साठा 4,362.16 द.ल.घनफूट आहे. शुक्रवारी एका दिवसाचा 148 मि.मी. इतका पाऊस झाला आहे, तर विसर्ग 7 हजार 212 मि.मी. इतका आहे. गतवर्षी आजमितीस 3,149 मि.मी. विसर्ग होता, या तुलनेत यंदा  1400 मि.मी. इतका पाऊस जादा झाल्याची नोंद आहे.