Wed, Apr 24, 2019 08:23होमपेज › Kolhapur › धुवाँधार पावसाने शहराला झोडपले

धुवाँधार पावसाने शहराला झोडपले

Published On: Nov 07 2018 1:31AM | Last Updated: Nov 07 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

विजांच्या कडकडाटासह आलेल्या धुवाँधार पावसाने मंगळवारी रात्री शहर व परिसराला झोडपून काढले. बुधवारच्या लक्ष्मीपूजनासाठी साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती; पण या उत्साहावर पावसाचे पाणी फिरले. अचानक आलेल्या पावसाने महाद्वार रोडसह शहरात विविध ठिकाणच्या व्यावसायिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.  

मंगळवारी दिवसभर वातावरणात उष्मा होता. सायंकाळनंतर गार वारे वाहू लागले, त्या जोडीला अधूनमधून कडाडणार्‍या विजा पाऊस येण्याची चाहूल देत होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास जिल्ह्याच्या करवीर व पन्हाळा तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. शहरात मात्र फक्त विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाराच वाहत होता. नऊच्या सुमारास उपनगरांत व नंतर शहरातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने रस्त्यावर पाणी-पाणी करून सोडले. रस्त्यावर मांडलेला व्यवसाय आवरताना व्यापार्‍यांची दमछाक झाली. तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना या अचानक आलेल्या पावसामुळे दुकानांचाच आश्रय घ्यावा लागला. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या रिमझिम सरी सुरूच होत्या. 

हा पाऊस पिकांना दिलासा देणारा ठरणार आहे. सध्या ऊस पिकाला पावसाची गरज होती. कारखान्यांचा हंगाम बंद असल्याने ऊस कधी जाणार, हे निश्‍चित नाही. त्यामुळे उसाला पाणी पाजण्याचे नियोजन सुरू असतानाच मंगळवारी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका भात पिकाला बसण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी भात कापून त्याची मळणी सुरू आहे. अचानक आलेल्या या पावसाने भात मळणीची तयारी करणार्‍या शेतकर्‍यांची धावपळ उडाली.