कोल्हापूर : गारांसह जोरदार पावसाने भुदरगड तालुक्याला झोडले (video)

Last Updated: Apr 10 2020 5:44PM
Responsive image


गारगोटी : रविराज पाटील

जोरदार पावसासह झालेल्या गारांच्या वर्षावाने भुदरगड तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. सर्वत्र गारांचा खच पडलेला होता. साडेतीनच्या सुमारास अर्धा तास झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले.

गेल्या काही दिवस तापमान चांगलेच उष्ण झाले होते. लॉकडाऊनमुळे घरी थांबलेल्या सर्वांनाचा एप्रिलच्या झळा बसत होत्या. रात्रीपासूनस वातावरणात बदल होत होते. दिवसभर संपूर्ण परिसर ढगांनी आच्छादला होता. साधारण साडेतीनच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. जोरदार वारे आणि पावसासह गारांनीही जोरदार झोडपले. वीजांच्या जोरदार कडकडाटाने परिसर दणाणला होता. पडणाऱ्या गारांमुळे काही काळ रस्ता पांढरा शुभ्र दिसत होता. सुमारे अर्धातास पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी केले होते.

जोरदार पावसामुळे रस्ते, गटारी भरून पाणी वाहत होते. तालुक्यात कडगाव, पाटगाव, वाघापूर, पिंपळगाव, मिणचे परिसरातही या पावसाने हजेरी लावली. ऊस पिकासाठी हा पाऊस उपयुक्त मानला जातो. मात्र, भुईमूग व सूर्यफूल पिकांचे यामुळे मोठे नुकसान होणार आहे. जनावरांचा वाळलेला चाऱ्याचेही मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे.

काही दिवसांच्या उष्ण वातावरणामुळे बेहाल झालेल्या नागरिकांना या पावसाने थोडासा आल्हाद दायक गारवा काहीकाळांसाठी देऊन गेला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच थांबूण आहेत. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे कोणाचीही दैना उडाली नाही. उलट सर्वजण घरीच असल्याने गारांसह पडणाऱ्या पावसाचा बालचमुसह मोठ्यांनी चांगलाच आनंद लुटला.