Sun, Oct 20, 2019 01:08होमपेज › Kolhapur › संकटांचा डोंगर उभाच; भाजीपाला गायब, गॅससाठी रांगा अन् कडधान्याची टंचाई

संकटांचा डोंगर उभाच; भाजीपाला गायब, गॅससाठी रांगा अन् कडधान्याची टंचाई

Published On: Aug 14 2019 8:16PM | Last Updated: Aug 14 2019 8:01PM
कौलव : प्रतिनिधी

भोगावती नदीला आलेल्या पुराची तीव्रता कमी झाली असली, तरी या पुरामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे बाजारात भाज्‍यांची कतरता निर्माण झाली आहे. त्‍यात उपलब्‍ध भाज्‍यांचे दर गगनाला भिडल्‍याने आहारातून भाजीपाला गायबच झाला आहे. गॅस सिलेंडरसह कडधान्यांचीही टंचाई जाणवू लागल्‍याने नागरिकांच्या जीवनावश्यक वस्‍तूंसाठी रांगा लागल्‍याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

राधानगरी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्यामुळे भोगावती, दुधगंगा व तुळशी नदयांच्या महापूराने थैमान घातले होते. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात ऊस, भात व अन्य खरीप पिकांसह भाजीपाल्याचे पीक मोठ्‍या प्रमाणात घेतले जाते. हा सकस भाजीपाला स्थानिक आठवडा बाजारात विक्री केला जातो. त्यामुळे ग्राहकांना हा भाजीपाला स्वस्त व किफायतशीर मिळतो, मात्र महापुरामुळे भाजीपाल्याचे पिकच नष्ट झाले आहे. परिणामी आठवडा बाजारात भाजीपाल्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. कर्नाटकच्या भाजीपाला विक्रेते टेंपो घेऊन भाजीपाला विक्री करत आहेत, मात्र हा भाजीपाला अवघ्या एका दिवसात कुजून जातो. बाजारात जो भाजीपाला उपलब्ध आहे तो चढ्या भावाने विकला जात आहे. एरवी मातीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या वांग्यांचा दर प्रतिकिलो 120 रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आहारातून भाजीपाला गायबच झाला आहे.

भाजीपाला टंचाईमुळे लोकांनी आपला मोर्चा कडधान्याकडे वळवला आहे. मात्र आठवडाभराच्या पुरामुळे दुकानदारांकडील अन्नधान्याचा साठा घटला असून, कडधान्येही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. शिधापत्रिकेवर रॉकेल पुरेसे मिळत नाही. पुरादरम्यान स्वयंपाकाच्या गॅसची सिलेंडर रिकामी झाली आहेत. त्यामुळे गॅस विक्रेत्यांच्या दारासमोर शेकडो लोकांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध सिलेंडर वितरीत करताना गॅस विक्रेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.