शहरात धुवाधार; आजही मुसळधार

Last Updated: Jun 02 2020 1:10AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शहरात सोमवारी सलग दुसर्‍या दिवशीही धुवाधार पाऊस झाला. शहर आणि परिसराला पावसाने झोडपल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. चार ठिकाणी झाडे कोसळली. तासाभरात 29 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. उद्या, मंगळवारीही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्‍त केली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही तडाखा बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आले असतानाच, शहरात जोरदार पाऊस सुरू झाल्याने जिल्ह्यातील वातावरण आता पावसाळीच झाले आहे. 

सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी काही काळ वातावरण निरभ— झाले. मात्र, दुपारी चारनंतर अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाचनंतर पावसाचा जोर वाढला. राजारामपुरी, शिवाजी विद्यापीठ परिसर, राजेंद्रनगर, आर.के.नगर, शेंडा पार्क, सुभाषनगर, वर्षानगर, एस.एस.सी. बोर्ड, हॉकी स्टेडियम, जवाहरनगर आदी परिसरात सायंकाळी धुवाधार पाऊस झाला. पावसाचा जोर इतका होता की, अवघ्या चार-पाच फुटांवरीलही काही दिसत नव्हते. सर्व वाहनांना दिवे लावून अत्यंत संथगतीने या मार्गावरून ये-जा करावी लागत होती.

उड्डाणपूल ते शिवाजी विद्यापीठ, सायबर चौक ते शेंडा पार्क या मार्गांवर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. एन.सी.सी. भवन ते राजेंद्रनगर या मार्गावर ओढ्याजवळ सुमारे फूटभर पाणी रस्त्यावर साचले होते, त्यातूनच वाहनांची ये-जा सुरू होती. काही वेळानंतर या मार्गावरील पाणी ओसरले. अशीच अवस्था हॉकी स्टेडियमजवळील शेंडा पार्क ते म्हाडा कॉलनी या रस्त्यावरही होती. साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत होता. उतारावरून पाण्याचे लोंढे वाहत येत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात कचराही येत होता. एस.सी.सी. बोर्ड, वर्षानगर परिसरात वाहते पाणी काही घरांतही शिरले. 

जोरदार पावसाने आजही शहरातील गटारींना नाल्यांचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावरूनच गटारी वाहत होत्या. शहरातही जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर महाविद्यालय या रस्त्यावर पाणी साचले होते. यासह राजारामपुरी परिसरातही अनेक ठिकाणी पाणी होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रस्त्यावरील साचलेले पाणी ओसरले. उपनगरांतही पावसाने नागरिकांचे हाल झाले. मैदानांसह मोकळ्या जागेतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. भाजीपाला विक्रेते तसेच फेरीवाल्यांचे आजही हाल झाले. पाऊस थांबल्याने काहींनी विक्री पुन्हा सुरू केली. 

शहरात पावसाने वारणा कॉलनीत इमारतीजवळ मोठे झाड पडले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. देवणे कॉलनी, सानेगुरुजी वसाहत, देवकर पाणंद ते कळंबा रोड या ठिकाणीही झाडे पडली. अग्‍निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन ही झाडे बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.

शहराच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला असला, तरी काही भागात मात्र पावसाचा जोर नव्हता. शहरात केवळ एका तासात 29 मि.मी.पावसाची नोंद झाली. तर रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ या गेल्या 24 तासांत शहरात 35 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातही गेल्या 24 तासांत सरासरी 17.36 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस करवीर तालुक्यात 45.73 मि.मी. इतका झाला. चंदगडमध्ये 21.33 मि.मी., कागलमध्ये 19.43 मि.मी., शाहूवाडीत 25.50 मि.मी., पन्हाळ्यात 16.43 मि.मी., राधानगरीत 16.83 मि.मी., गगनबावड्यात 15.04 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 11.86 मि.मी., भुदरगडमध्ये 12.20 मि.मी., तर आजर्‍यात 18.75 मि.मी. पावसाची नोंद झाली. पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधार्‍यावर 10.6 फूट इतकी होती.