होमपेज › Kolhapur › जिल्हा परिषदेचे ‘आरोग्य’ बिघडले

जिल्हा परिषदेचे ‘आरोग्य’ बिघडले

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 1:06AMकोल्हापूर : सदानंद पाटील

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 16लाखांचा औषध घोटाळा झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मात्र उघड न झालेले अनेक घोटाळे या विभागात घुटमळत आहेत. या विभागात औषध खरेदीसह उपकरणांची खरेदी, लॅपटॉपची हेराफेरी, बायोमेट्रीक मशीन खरेदी, विविध प्रकारची कंत्राटे आदीमध्येही मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. या सर्व उद्योगात विभागातील काही कर्मचारी, अधिकारी यांचाही समावेश आहे. मात्र याशिवाय काही वादग्रस्त सदस्यांचाही यात सहभाग आहे. सभागृहात वादविवाद, आरोप-प्रत्यारोप आणि तक्रारीची पत्रे देवून नंतर हळूच या सर्वातून माघार घेण्याची प्रथा मागील दोन सभागृहांनी अनुभवली आहे. आताही यापेक्षा वेगळं काही घडताना दिसत नसून आरोग्य विभागामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

वर्षभरात आरोग्य विभागाची कामगिरी काय?

गेल्या वर्षभरात आरोग्य विभागाने कोणतीही भूषणावह कामगिरी केलेली नाही. उलट या विभागातील कमिशनचीअनेक प्रकरणे उघड झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पाटील यांच्यापूर्वी आरोग्य विभागाने चांगल्या कामाने आपले नाव राज्यात आणि देशात कमा राज्य व केंद्र शासनाने कायापालटसारखी योजना स्विकारली. मात्र या वर्षात विभागाची निव्वळ बदनामी झाली आहे. विभागातील घोटाळे बाहेर येत असताना यावर पदाधिकार्‍यांचे असणारे मौन, चिंताजनक आहे.

डीएचओ पदासाठी लॉबींग

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर या पदाचा कार्यभर मिळावा, यासाठी मोठे लॉबींग सुरु आहे. गेले वर्षभर या विभागात पाटील यांच्या कारभारावरुन धुसफूस सुरु होती. मात्र औषध घोटाळयाचे निमित्त होवून पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. या पदाचा कारभार सध्या डॉ.उषादेवी कुंभार यांच्याकडे दिला आहे. मात्र वादग्रस्त ठरलेल्या एका अधिकार्‍याला या पदाचा कारभार द्यावा,यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. 

30 लाखाची फाईलने घोटाळा चव्हाट्यावर

आरोग्य विभागाच्या औषध भांडार विभागाकडून 30 लाखांच्या औषध खरेदीची एक फाईल सादर करण्यात आली. या फाईलमधून किती कमाई करायची यासाठी जणू स्पर्धाच लागली होती. कमाईचा आकडा मिळवून देण्यासाठी स्पर्धाच लागली होती. ही रक्कम देण्यासाठी बोली लागल्यानंतर या घोटाळ्याला तोंड फुटले. औषध खरेदीसह अन्य दोन फाईलही अशाच प्रकारे फिरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

घोटाळा आरोग्यात पडसाद वित्तमध्ये

आरोग्य विभागातील घोटाळ्याच्या चौकशी अहवालाची वित्त विभागात छाननी झाली. औषध घोटाळ्यासह विभागातील प्रत्येक खरेदीची फाईल वित्तच्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्याकडून जाते. मात्र याबाबतची जबाबदारी केवळ आरोग्यच्या कर्मचार्‍यांवरच सोपवून वित्त विभाग नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करत असल्याकडे गुरुवारी प्रसारी माध्यमानी लक्ष वेधले. त्यामुळे या विभागात गुरुवारी चांगलीच फाईलींची आदळआपट झाली. हे प्रकरण वित्त विभागावर शेकू नये म्हणून, एक यंत्रणा सक्रीय झाली आहे.