Tue, Jul 16, 2019 02:14होमपेज › Kolhapur › औषध खरेदीत 16 लाखांचा घोटाळा

औषध खरेदीत 16 लाखांचा घोटाळा

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 1:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या औषध खरेदीत 16 लाखांचा घोटाळा झाल्याचे प्राथमिक चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. यात 6 लाखांची अनावश्यक तर 10 लाखांची अत्यावश्यक खरेदी वाढीव दराने केल्याचेही स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्यात जबाबदार असणार्‍या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील व औषध निर्माण अधिकारी बी.डी.चौगुले यांना सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी कारणे दाखवा नोटीस लागू केली आहे. 

येत्या 7 दिवसात खुलासा देण्यात सांगण्यात आले आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्यावरील कारवाईचा अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवण्यात येणार आहे. औषध निर्माण अधिकारी हे पद कोणत्या वर्गात बसते हे बघून विभागीय आयुक्तांकडे खातेनिहाय चौकशी संबंधी शिफारस केली जाणार आहे. याशिवाय ही बिले मंजुरीची प्रक्रिया असणार्‍या आरोग्य व वित्त विभागातील कर्मचार्‍यांचीही माहिती सीईओ डॉ. खेमनार यांनी मागवली आहे. या घोटाळ्यात या कर्मचार्‍यांचा कितपत सहभाग आहे, याची माहिती घेऊन त्यांच्यावरही कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता डॉ. खेमनार यांनी अधिकारी, कर्मचार्‍यांना वर्तवणुकीच्या बाबतीत वारंवार सूचना दिल्या आहेत. एकवेळ वर्तवणूक खपवून घेतली जाईल, पण आर्थिक बाब गंभीर असल्याने कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. साखळी उद्ध्वस्त करण्याची भूमिका सीईओंनी घेतल्यामुळे या घोटाळ्यात सहभागी असणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील व औषध निर्माण अधिकारी बी. डी. चौगुले यांना आधीच एक महिनाभरासाठी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आता त्यांच्यावर थेट कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्व यंत्रणा हडबडली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्याविषयी अन्य तक्रारीचीही गंभीर दखल घेतली गेली आहे. डॉ. पाटील यांना दिलेल्या नोटिसीत याचा उल्लेख करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समिती, आरोग्य केंद्राचे बांधकाम आदि बाबतीत आरोग्य अधिकारी म्हणून भूमिका निभावण्यात डॉ. पाटील यांना अपयशच आले आहे. निधी खर्च पडलेला नाही. बांधकामे रखडलेली आहेत. या सर्वांचा जाब नोटीशीद्वारे विचारण्यात आला असून 7 दिवसात याचा खुलासा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.