Thu, Apr 25, 2019 05:56होमपेज › Kolhapur › ‘रिझर्व्ह बँकेच्या नोटांचा छापखाना कोल्हापुरात’

‘रिझर्व्ह बँकेच्या नोटांचा छापखाना कोल्हापुरात’

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 09 2018 2:04AMवडकशिवाले : वार्ताहर

कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवक फोडोफोडीसह कुरूंदवाड नगरपालिकेत झालेल्या घोडेबाजारामुळे रिझर्व्ह बँकेच्या नोटांचा छापखाना कोल्हापुरात आहे, असे वाटायला लागले आहे, असा उपरोधिक घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. वडकशिवाले (ता. आजरा) येथील आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

आ. मुश्रीफ म्हणाले, राजकारणातील आर्थिक घोडेबाजारीला आळा घालण्यासाठी कोल्हापुरात व्यापक बैठक झाली होती. त्यावेळी मी स्वतः महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, विनय कोरे, सतेज पाटील या सर्वांनी घोडेबाजार करायचा नाही. त्यामुळे भ्रष्टाचार फोफावून कोल्हापूर शहराच्या विकासावर दुष्परिणाम होतो, अशी चर्चा झाली होती. त्यामुळे पक्षीय निवडणुका लढविल्या जातील, जेणेकरून पक्षांतर बंदी विधेयक कायद्यामुळे नगरसेवक अशा कृत्यांना धजावणार नाहीत, अशीही चर्चा झाली होती. परंतु, त्यांना अपात्र होणार नाही याबद्दल हमी देऊन सर्रास फोडोफोडीचे राजकारण सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

अलीकडच्या काळात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात घडत चाललेल्या अनेक राजकीय उलथापालथीत धक्कादायक असल्याचे सांगतानाच ते म्हणाले, कोल्हापूर महापालिकेच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या स्थायी समिती सभापती निवडीत प्रत्येकी दीड कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडले तसेच वर्तमानपत्रामधून महापौर निवडीसाठी पाच कोटी रुपयांच्या बॅगा तयार आहेत, असेही आपल्या वाचनात आले आहे. तसेच कुरूंदवाड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी तीन नगरसेवकांना प्रत्येकी वीस लाख रुपये दिल्याचेही समजते, असेही त्यांनी सांगितले. 
कार्यक्रमास वसंतराव धुरे, काशीनाथ तेली, शिरीश देसाई, संभाजी तांबेकर, अनिल चव्हाण, नानासाहेब संकपाळ आदी उपस्थित होते.

 तर त्यांच्या दारात घाणीच्या बुट्ट्या ओतू
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या या वारेमाप पैशाच्या वापराबद्दल व घोडेबाजाराबद्दल कालच कोल्हापूर शहरातील डाव्या विचारांचे कार्यकर्ते आपल्याला भेटून त्यांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगून ते पुढे म्हणाले, त्या कार्यकर्त्यांची भूमिका अशी होती की, कोल्हापूरसारख्या वैचारिक दिशा असणार्‍या शहरात हे असले प्रकार निंदाजनकच आहेत. हे घाणेरडे प्रकार तातडीने थांबले नाहीत तर असे प्रकार करणार्‍यांच्या दारात घाणीच्या बुट्ट्या ओतू, असा इशाराही त्यांनी दिल्याचे ते म्हणाले. 
 

Tags :  kolhapur ajra, hasan mushrif