होमपेज › Kolhapur › महाडिक-मुश्रीफ दुरावा कायम

महाडिक-मुश्रीफ दुरावा कायम

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:43AMकोल्हापूर : निवास चौगले

राज्यात आणि देशात एकीकडे सरकारविरोधात सर्व विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना आणि राज्यात राष्ट्रवादी काँगे्रस त्यात आघाडीवर असताना जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्यातील दुरावा मात्र वाढत चालला आहे. या दोघांतील छुप्या वादाला तशी लोकसभेच्या निकालापासूनच सुरुवात झाली; पण अलीकडे मतभेदाची ही दरी जास्तच रुंदावली आहे. 

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून मुश्रीफ यांची पहिली पसंती ही प्रा. संजय मंडलिक यांनाच आहे. दोन वेळा जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे बोलूनही दाखवले आहे. त्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार कोल्हापूरला आले.  खासदार महाडिक यांच्या घरी गेले. काही गुजगोष्टी केल्या, तरीही मुश्रीफ यांच्या यादीत मात्र महाडिक नाहीतच. महाडिक जरी काही म्हणत असले, तरी त्यांची दिशा निश्‍चित नाही, हे अलीकडच्या त्यांच्या वक्तव्यावरून कळत आहे. त्यांना दुसर्‍यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला; पण त्याची घोषणा पक्षाच्या व्यासपीठावरून नाही. 

महाडिक यांच्या राजकारणाचे सर्वेसर्वा त्यांचे काका म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक हे सध्या भाजपसोबत आहेत. त्यांचे एक चुलतबंधू भाजपचे आमदार, तर भावजय भाजपच्याच जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत. त्यातूनही राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली, तर व्यासपीठावर काका नसतील. राजकीय परिस्थिती बघितली, तर पक्षातील वातावरण त्यांच्या बाजूने नाही.  त्यांच्यासोबत मुश्रीफ नाहीत, हेही आता लपून राहिलेले नाही. दुसर्‍या पक्षाची उमेदवारी जाहीर करायची, तर तेही धाडस होत नाही. यातून त्यांची अवस्था अभिमन्यूसारखी झाली आहे. 

 त्यापुढे जाऊन राष्ट्रवादीची उमेदवारी घेतलीच, तर मुश्रीफ त्यांचे सारथ्य खर्‍या अर्थाने करतील का, याविषयी शंका आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ व काँगे्रसचे आमदार सतेज पाटील यांची जवळीक अधिक आहे. एक वेळी मुश्रीफ पक्ष म्हणून त्यांना मदत करतील; पण आमदार पाटील काहीही झाले तरी मदत करणार नाहीत. किंबहुना, महाडिक यांनी स्वतःहून राष्ट्रवादीची उमेदवारी सोडावी, असेच या दोघांना वाटत आहे; पण तसे धाडसही महाडिक यांच्याकडून होईल की नाही, याची शंकाच आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर धनंजय महाडिक अपवादानेच पक्षाच्या व्यासपीठावर दिसत होते. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत ते पक्षासोबत राहिले नाहीत. त्यातूनच महाडिक-मुश्रीफ दुरावा वाढत गेला. आता हा दुरावा निर्णायक टोकाला असतानाच मंडलिक-मुश्रीफ गट एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत पाच-दहा आमदारांपेक्षा एक खासदार महत्त्वाचा आहे, असे जरी पक्षाध्यक्ष पवार यांना वाटत असले, तरीही खासदारांच्या विजयासाठी झटणारेच नाराज असतील तर तेही उमेदवारी लादणार का, असाही प्रश्‍न आहे. दुसरीकडे राज्यातील भाजप-सेना युतीबाबत संभ्रमावस्था आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीला कितीही नकार देत असले, तरी भाजपला मात्र ही युती हवी आहे. त्यासाठी ठाकरेंच्या काही अटीही स्वीकारण्याची तयारी भाजपची आहे. त्यातून युती झाली तर कोल्हापूरची शिवसेनेकडे असलेली जागा भाजप घेईल का, हा नवा पेच निर्माण होणार आहे.