Fri, Jul 19, 2019 05:05होमपेज › Kolhapur › ...‘त्यांची’ जादू विधान परिषदेत दिसली असती

...‘त्यांची’ जादू विधान परिषदेत दिसली असती

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जर ते जादूगार असते, तर त्यांची जादू विधान परिषद निवडणुकीत दिसली असती, असा अप्रत्यक्ष टोला आ. हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना लगावला. जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिका स्थायी समिती सभापती निवडीनंतर आपणच याचे जादूगार असल्याचे माजी आमदार महादेराव महाडिक यांनी सांगितले. तसेच येणार्‍या महापौर निवडणुकीतही बदल घडवण्याचे त्यांनी वक्तव्य केल्याबाबत विचारले असता, आ. मुश्रीफ यांनी टोला लगावला. 

महापालिका स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी पैशासाठी गद्दारी केली. सूर्याजी पिसाळाची भूमिका घेतली. त्यांचा मी निषेध करतो. अशा घटना ज्यावेळी घडतात, त्या अपमानाची जखम मी भरू देत नाही. ती ठसठसण्यासाठी जपूनच ठेवतो. या गद्दारांनी आपले राजकीय व सामाजिक करिअर संपवून घेतल्याची सणसणीत टीकाही आ. मुश्रीफ यांनी केली.

आ. मुश्रीफ म्हणाले, स्थायी समितीत राष्ट्रवादीचे तीन सदस्य असून यातील एका सदस्यास 2 वर्षे प्रभाग समितीचे अध्यक्ष, तर दुसर्‍या सदस्याला शिक्षण समितीचे चेअरमन करण्यात आले होते. महिला सदस्या मेघा पाटील यांना ‘स्याथी’चे सभापती करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी पैशासाठी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केले. 
महापालिकेत बंद असलेला घोडेबाजार आता पुन्हा सुरू झाला असून, शहर विकासासाठी हे घातक असल्याचे त्यांनी सांगितले. आपण भाजपबरोबर काही ठिकाणी युती केली, ती पक्षीय पातळीवर केली. त्याचा या निवडणुकीशी संबंध जोडणे योग्य नसल्याचेही आ. मुश्रीफ यांनी सांगितले. या सदस्यांना फोडण्यासाठी काही सदस्यांनीच प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी एक नगरसेवक आपणास आज सकाळीच भेटून गेले असून, त्यांनी आपला या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र, त्यावर मी विश्‍वास ठेवलेला नाही. सदस्यांना फोडण्याचा ‘कारभार’ कोणी केला याचा शोध सुरू असल्याचे आ. मुश्रीफ यांनी सांगितले.  आम्हीही सत्तेत 15 वर्षे राहिलो आहोत; मात्र खरेदी-विक्रीचा प्रकार घडला नाही. सत्ता ही कायमची नसते. त्यामुळे जपून राहावे, असा सल्ला त्यांनी भाजप नेत्यांनाही यावेळी दिला.