Wed, Jul 17, 2019 18:29होमपेज › Kolhapur › हारुगडेवाडी दारूबंदी चळवळीत राजकारण?

हारुगडेवाडी दारूबंदी चळवळीत राजकारण?

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 12:13AM

बुकमार्क करा
बांबवडे : आनंदा केसरे

शाहूवाडी तालुक्यातील वारणा पट्ट्यात गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात गावागावांत दारूबंदीचे वातावरण तयार झाले. सरूड, शिवारे, माणगाव, भेडसगाव येथे दारूबंदी झाली. बुधवारी हारुगडेवाडी येथे मात्र दारूबंदीच्या चळवळीस ‘खो’ बसला. संघटितपणे महिला, तरुण कार्यकर्ते दारूबंदी करत होते. परंतु, या चळवळीत आता राजकारण व अर्थकारणाचा प्रवेश झाला असल्याचे हारुगडेवाडी, नेर्ले येथील घटनांमधून स्पष्ट होत आहे.

तालुक्यात गावोगावी मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी, गावठी दारू विकली जात होती. गावोगावी असणार्‍या गुर्‍हाळघरांतून मळीची दारू मोठ्या प्रमाणात तयार होत होती. पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागात अर्थसहाय्य करून गावोगावी बिनपरवान्यांची दारूची विक्री राजरोस होती. तरुणपणीच आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षभरापासून वारणा पट्ट्यात अनेक गावांतील महिला, तरुण-तरुणी दारूबंदीसाठी परिश्रम घेत आहेत. त्यांची सुरुवात शिवारे गावातून झाली. दारूबंदीचे प्रसारक गिरीष फोंडे यांनी मार्गदर्शन करून शिवारेसारख्या दारूचे आगर असणार्‍या गावातून दारूबंदी करून नवीन व्यसनमुक्‍ती चळवळीची सुरुवात केली. आणि त्याचा आदर्श इतर गावांनी घेतला. शाहूवाडी तालुक्यातील लोकसंख्या आणि आकारमानाने मोठ्या असणार्‍या सरुड गावात तरुण व नारीशक्‍तीने दारूबंदी चळवळ यशस्वी केली. सरूडपाठोपाठ  माणगाव येथे दारूबंदी यशस्वी झाली. भेडसगावात एकमुखी निर्णय घेत दारूबंदी केली.

दरम्यान, बुधवारच्या हारुगडेवाडी येथे दारूबंदीसाठी मतदान झाले. बाटली आडवी करण्यास तसेच 10 दिवसांपूर्वी नेर्ले येथे झालेल्या मतदान प्रक्रियेतीलही घोळ या प्रकारावरून दारूबंदी चळवळीस ‘खो’ बसत आहे, असे निदर्शनास येत आहे.

शाहूवाडी यापूर्वी ज्या ज्या गावात दारूबंदीसाठी मतदान झाले. तेथे बहुमताने बाटली आडवी झाली. परंतु, नेर्ले येथील घटनेत सावकारी यंत्रणेच्या सहकार्याने बाटली उभी राहिली, असा दारूबंदीच्या आडव्या बाटली समर्थकांचा आरोप आहे. तर हारुगडेवाडी येथे गावचे अंतर्गत राजकारण नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक तसेच दारूबंदीच्या विरोधात समर्थकांनी राबवलेले अर्थपूर्ण धोरण यास कारणीभूत आहे, असेही बोलले जात आहे.

परिणामी, या गोष्टीत राजकरण, अर्थकारण येत असेल तर दारूबंदी चळवळी बाटली आडवी होण्यास अडचणी येणार आणि समाज गैरवाटचालीकडे मार्गक्रमण करणार यात शंका नाही.