Wed, Apr 24, 2019 11:46होमपेज › Kolhapur › दिव्यांग खेळाडूंसाठी स्वतंत्र स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी

दिव्यांग खेळाडूंसाठी स्वतंत्र स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 03 2018 11:26PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

शारीरिक अपंगत्वाची तमा न बाळगता जिद्द-चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मैदान गाजवत धडधाकटांना लाजविणारी रांगडी कामगिरी दिव्यांग खेळाडू करत आहेत. जिल्हा स्तरापासून ते राज्य-राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची चौफेर घोडदौड सुरू आहे. अशा खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याच्या उद्देशाने दिव्यांग खेळाडूंसाठी कोल्हापुरात स्वतंत्र स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. 

 राज्यस्तरीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित पहिल्या पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेस पोलिस कवायत मैदानावर शनिवारी आ. सतेज पाटील यांच्या हस्ते आणि महापौर सौ. स्वाती यवलुजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, सीपीआरचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश ककडे, रयत क्रांती संघटनेचे परेश भोसले, ऋतुराज पाटील, राज कोरगावकर आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पॅरालिंपिक स्पोर्टस् असो. तर्फे 18 व्या राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा पंचकुला (हरियाणा) येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार्‍या महाराष्ट्र राज्य संघाची निवड चाचणी आणि पहिली राज्य पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा ‘क्रीडानगरी’ कोल्हापुरात आयोजित करण्यात आली आहे. पोलिस कवायत मैदान कसबा बावडा आणि शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर सुरू आहेत. धावणे, लांब व उंच उडी, भाला-गोळा व थाळी फेक प्रकारात ही स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत सुमारे 400 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. यात जिल्ह्यातील 45 खेळाडू सहभागी झाले आहेत. 
यावेळी जिल्हा पॅरा अ‍ॅथलेटिक्स असो.चे अध्यक्ष देवदत्त माने, उपाध्यक्ष विकास चौगुले, सुरेश ढेरे, उमेश चटके, युनूस शेख, सरदार पाटील, जानकी मोकाशी, रंजना गुलाईकर आदी उपस्थित होते.