Tue, Mar 19, 2019 16:11होमपेज › Kolhapur › जलप्रबोधनाची गरज होतेय अधोरेखित!

जलप्रबोधनाची गरज होतेय अधोरेखित!

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 12:26AMहमीदवाडा : मधुकर भोसले

काही गोष्टी निर्माण करता येत नाहीत व हाच निसर्गाने राखून ठेवलेला हाचा म्हणावा लागेल. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पाणी होय. पाणी निर्माण करता येत नाही पण ते वाचवणे आपल्या हाती आहे. जलसमृध्द तालुक्यांमध्ये सध्या होत असलेला पाण्याचा बेसुमार वापर धक्कादायक आहे. विषेशतः शेतीच्या बाबतीत तर पाणी देण्याची पध्दत आजही अधिकाधिक ठिकाणी पारंपरिकच आहे व ही पद्धती प्रचंड पाणी वापरातील आहे. यावरून सध्या शेतकरी वर्गामध्ये जलप्रबोधन किती अत्यावश्यक आहे हे स्पष्ट होते. कोल्हापूर जिल्ह्यास आर्थिकतेबरोबरच जलसमृध्द जिल्हा म्हणून पाहिले जाते. असे जरी असले तरी सर्वच धरणे दर वर्षी भरतात असेही नाही. म्हणून तर त्यामुळे ऊसासारखे मुबलक पाणी घेणारे पीक जसे जिल्ह्यात फोफावले तसा पाण्याचा प्रचंड वापर व अपव्ययही वाढला. पाणी पिकाला की जमिनीला? असे प्रश्‍न देखील शेतीतील तज्ञ उपस्थित करताहेत.

सर्‍या भरून पाणी पाजले तरच ऊस चांगला येतो. हा मोठा समज शेतकर्‍यांमध्ये आहे. याचवेळी ठिबक पध्दतीमध्ये अवघ्या 30 टक्के पाण्यात उत्पादन पारंपरिक पाणी पध्दतीपेक्षा अधिक उत्पन्न वाढते आहे. द्रव रूपातील खते व्यवस्थित पोचतात. तन नियंत्रण होऊन इतर खर्च देखील कमी येतो. हे सारे कृषी तंत्रज्ञ व साखर कारखाने देखील शेतर्‍यांपर्यंत पोहोचवत आहेत. मात्र सरसकट शेतकरी हे प्रबोधन गांभीर्याने घेत नाहीत असे दिसते. दोन वर्षांपूर्वी दुष्काळ तीव्र होता तेव्हा सरकारने पाणी परवाने देताना ठिबकची सक्ती करूनच परवाने देणार असा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही असे दिसते. सध्या पाण्याचा होणारा अपव्यय पाहता प्रबोधनाबरोबरच शासकीय पातळीवर सक्‍तीने काही निर्णय लागू करणे अपरिहार्य आहे.