Sun, Apr 21, 2019 02:22होमपेज › Kolhapur › दिवंगत नेत्यांच्या नावाने गाजतंय राजकारण!

दिवंगत नेत्यांच्या नावाने गाजतंय राजकारण!

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 19 2018 12:13AMहमीदवाडा : मधुकर भोसले

कागलच्या राजकीय विद्यापीठात दिवंगत नेत्यांप्रती कळवळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.  या स्वर्गीय नेत्यांच्या नावाने त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटना, त्यांची वक्‍तव्ये याची आठवण करून देत सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. यामध्ये  माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या नावाने जोरदार भाषणे सुरू आहेत. हा संघर्ष आ.हसन मुश्रीफ व ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यातच अधिक आहे. 

कागलच्या विकासात कै. मंडलिक व कै. घाटगे यांचे योगदान सर्वज्ञात आहे. या दोन दिग्गजांनी कमालीचा राजकीय संघर्ष केला. उत्तरार्धात काही काळ हे दोघे एकत्रही आले.  कै. राजेनंतर समरजितसिंह घाटगे काही काळ आ. मुश्रीफ यांच्यासोबत राहिले. म्हणजे काही जाहीर कार्यक्रमात देखील ते एकत्र दिसत होते. पण, राजेंच्या निधनानंतर शाहू ग्रुप व राजे गटाचे नेतृत्व हाती आलेल्या समरजितसिंह यांनी आता पाठिंब्यापुरता आपला गट ठेवणार नाही, असे जाहीर करून गटबांधणी सुरू केली.

 आ.  मुश्रीफ यांच्याशी संघर्षाची तयारी ठेवली.नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवली. समान सदस्य निवडून आणले. पुढे जिल्हा परिषद निवडणूकही समरजितसिंह घाटगे यांनी स्वबळावरच लढवली. या सार्‍या वाटचालीत तालुक्यात त्यांचा व आ. मुश्रीफ यांचाच संघर्ष अधिक ठळक होत गेला. सध्यातरी हे दोघेच नेते एकमेकांच्या विरोधात टिकाटिप्पणी करताना दिसत आहेत.

दोन संजय टिकाटिप्पणीपासून दूर

या वादात प्रा. संजय मंडलिक व संजय घाटगे फारसे वक्‍तव्ये करताना दिसत नाहीत. संजय घाटगे आपल्या कारखाना उभारणीकडे लक्ष केंद्रित करून आहेत. तर प्रा. संजय मंडलिक यांनी लोकसभेच्या दृष्टीने गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या दोन संजयमध्ये जाहीरपणे तरी संघर्ष नाही. सध्या तरी हे दोन्ही नेते राजकीय टिकाटिप्पणीपासून बाजूला आहेत व समरजितसिंह घाटगे व मुश्रीफ हे मात्र आरोपांच्या फैरी झाडण्यामध्ये आघाडीवर आहेत.