Wed, Jul 24, 2019 14:11होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात धरण लाभक्षेत्रातील पिकांची  होणार हवाई मोजणी  

जिल्ह्यात धरण लाभक्षेत्रातील पिकांची  होणार हवाई मोजणी  

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 03 2018 1:25AMहमीदवाडा : मधुकर भोसले

जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी जितक्या जमिनीसाठी पाण्याचा वापर करतात तितके क्षेत्र मात्र पाटबंधारेकडे नोंद करत नाहीत. त्यामुळे धरणांमध्ये साठणारे पाणी वापरूनही फसव्या क्षेत्र नोंदीमुळे खात्याचे कोट्यवधींचे नुकसान दरवर्षी होते. यामुळेच आता धरणांच्या लाभक्षेत्रातील पिकांची हवाई मोजणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पाटबंधारेने घेतला आहे. ड्रोन कॅमेरे वापरून ही मोजणी करून त्याचे थेट आकारणी पत्रकदेखील करून देण्याच्या कामाचे टेंडरदेखील जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केले आहे. यामुळे आता वास्तवातील भिजलेले क्षेत्र निश्‍चित होऊन पाटबंधारेचे उत्पन्‍न वाढण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात सुमारे सर्व मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांत मिळून सुमारे 70 ते 75 टीएमसीपर्यंत पाणीसाठा होतो. पटबंधारेच्या मानकानुसार 1 टीएमसी पाण्याने 5000 हेक्टर जमीन ओलिताखाली येते. या हिशेबाने जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आली. यामध्ये 85 ते 90 टक्के ऊस पीक आहे; पण प्रत्यक्षात पाटबंधारेच्या आकारणी पत्रकाला मात्र 2 लाख 10 हजार हेक्टरपर्यंतच शेतकर्‍यांकडून नोंद येत असल्याचे समजते. परिणामी, 1 लाख 40 हजार हेक्टर जमीन पाणी पिते. त्यात पिके फुलतात, मात्र ती लपवली गेली म्हणजे ती पीक पाहणी व पाटबंधारे पत्रकाला आलीच नाही.

काही धरणांत न होणारा 100 टक्के पाणीसाठा, कालव्याची अपूर्ण कामे असे काही संदर्भ असले व क्षेत्र घट केले, तरी किमान एक लाख हेक्टर क्षेत्र मात्र पाणी वापरूनही पाणीपट्टीच्या कक्षेत येत नाही. नदीवरील उपशासाठी हेक्टरी 1,200 रु. तर कालव्याच्या पाण्यासाठी हाच दार हेक्टरी 7 हजारपर्यंत आहे. जेव्हा 1 लाख हेक्टरपर्यंतचे क्षेत्र पाणी वापरूनही बाजूला राहते तेव्हा फक्‍त नदी उपशाच्या दराने पाहिले तरीही नुकसान 12 कोटींच्या घरात आहे. त्यामुळेच सरकारने आता हवाई पाहणीनेच लाभक्षेत्रातील खरे पीक पाहणी जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे.  याबाबत सरकारी-नोंदणीकृत ठेकेदारांकडून पहिल्या टप्प्यात राधानगरी, दूधगंगा, वारणा, पंचगंगा पाटबंधारे उपविभाग यांच्या कार्यक्षेत्रातील मोठे, मध्यम प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील पीक मोजणीचे टेंडर नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ही निविदा 14 मार्चला उघडली जाणार आहे.

कारखाने, गाळप वाढतंय; पण...

ऊस उत्पादन करणारा कोल्हापूर हा राज्यातील महत्त्वाचा जिल्हा  आहे. येथे गेल्या काही वर्षांत कारखाने वाढले, तसेच कारखान्यांच्या गाळप क्षमताही वाढल्या. हे सर्व होताना पाटबंधारेने कारखान्यांकडूनही ऊस क्षेत्र उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले; पण शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जाण्यापेक्षा कारखान्यांनी ही माहिती देणे टाळले. ऊस गाळप प्रचंड वाढले, मात्र पाटबंधारेचे पत्रक मात्र कासवगतीनेच आहे. विशेषतः, छोटे शेतकरी बोगस पीक नोंदी देत नाहीत. अनेक मोठे शेतकरी कर चुकवण्यासाठी असे करतात, मात्र नवतंत्रज्ञानाच्या आधारे नेमके क्षेत्र शोधले जाणार आहे.