होमपेज › Kolhapur › खरेदी केली; पण वाटपच नाही

खरेदी केली; पण वाटपच नाही

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 12:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

औषध खरेदीत हात ओले केलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी उपकरण खरेदीतही हात मारल्याचे आता समोर येत आहे. कोणतीही मागणी अथवा गरज नसताना तब्बल पावणेदोन लाखाची इन्फंट वॉर्मर खरेदी केली गेली. वर्षभरापासून हे वॉर्मर औषध भांडारात धूळ खात पडून आहेत. घोटाळ्याची चौकशी लागल्यानंतर यातील 3 वॉर्मर परळी निनाई या एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. मागणी नसतानाही वाटप करून विल्हेवाट लावण्याच्या या प्रकाराची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सध्या औषध खरेदी घोटाळा गाजत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व औषध निर्माण अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवून ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली आहे. लेखाशी संबंधित आरोग्य व वित्त विभागातील अधिकार्‍यांकडून माहितीचे संकलन सुरू करण्यात आले आहे. हे करत असताना उपकरण खरेदीतही घोळ असल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

आरोग्य विभागाने गेल्या मार्चमध्ये 2 लाख 88 हजार 82 रुपयांचे 11 वॉर्मर खरेदी केले गेले होते. एका वॉर्मरची किंमत 25 हजार 462 रुपये इतकी आहे. यापैकी 1 वॉर्मर माळ्याची शिरोली या प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आला. त्यानंतर कोणत्याही आरोग्य केंद्राकडून मागणी न आल्याने 10 वॉर्मर औषध भांडारात पडून होते. या घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्यानंतर यातील 3 वॉर्मर तातडीने शाहूवाडीतील परळी निनाई प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवण्यात आले. एका आरोग्य केंद्रात एक पुरेसा असतानाही एकाचवेळी तीन कसे आणि कशाच्या आधारावर दिले, याचा पत्ता प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनाही नाही. यासंदर्भातही त्यांना विचारले असता, त्यांनी याबाबत तालुका आरोग्य अधिकार्‍यांना जाब विचारल्याचे सांगितले.