होमपेज › Kolhapur › मध्यरात्रीपर्यंत गुटखा, माव्याची बिनधास्त विक्री

मध्यरात्रीपर्यंत गुटखा, माव्याची बिनधास्त विक्री

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 13 2018 10:16PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कायदा व सुव्यवस्थेच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणचे खाद्यपदार्थ, विविध व्यावसायिक फेरीवाले यांना रात्री दहावाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा असते. त्यानंतर मात्र पोलिसांकडून ते बंद केले जातात. याउलट गुटखा-मावा व तंबाखूजन्य गोष्टींना बंदी असतानाही त्यांची विक्री करणार्‍या टपर्‍या मध्यरात्रीपर्यंत बिनधास्त सुरू असतात. याबद्दल नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहे. 

बाहेर गावांहून शहरात येणार्‍या लोकांसाठी मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन व अन्य सार्वजनिक ठिकाणी खाऊगल्ल्या निर्माण करण्यात आल्या आहेत. याचा लाभ बाहेरील लोकांप्रमाणेच स्थानिक लोकही मोठ्या प्रमाणात घेतात. यामुळे या खाऊ गल्ल्यांवर अनेक कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू असतो. सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी गर्दी होऊ नये, गोंधळासारख्या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये या उद्देशाने खाऊगल्ली रात्री दहानंतर बंद केली जाते. ही शिस्त योग्य प्रामाणिकपणे पाळली जाते.

गुटखा-मावा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी करायला येणार्‍यांचा आवेश जणू आपण काहीतरी राष्ट्रीय कार्य करण्यासाठी आलो आहोत असा असतो. रहदारीच्या रस्त्यांवर कोठेही-कशीही वाहने लावली जातात.  याबाबत कोणी अक्षेप घेतलाच तर दुर्लक्ष करणे, अरेरावी करणे, अंगावर धावून जाणे असे प्रकार राजरोजपणे सुरू असतात. एवढ्यावरच न थांबता मावा-गुटखा खावून रस्त्याकडेला असणार्‍या गटरींमध्ये न थुंकता एकमेकांच्या पायात, रस्त्यावर, भितींवर थुंकले जाते.  

सपत्नीक-मुलाबाळांसह टपर्‍यांवर

आजच्या अधुनिक युगात गुटखा-मावा बहाद्दूर सपत्नीक-मुलाबाळांसह गुटखा-मावा खरेदी करण्यासाठी टपर्‍यांसमोर थांबलेले दिसतात. यामुळे पुढच्या पिढीवर आपण कसले संस्कार करणार आहोत? याचा विचारही केला जात नसल्याचे चित्र  आहे. 

दिवस-रात्र गुटखा-मावा उपलब्ध...

एकीकडे भुकेल्या पोटाला आधार असणार्‍या खाद्य पदार्थांना पोलिसांकडून कायदेशीर नियमांची सक्‍ती केली जाते. याउलट दुसरीकडे बंदी असणार्‍या गुटखा-मावा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची विक्री राजरोजपणे सुरू आहे. शहरासह उपनगरात गुटखा-माव्यासह तंबाखूजन्य पदार्थांची दिवस-रात्र विक्री सुरू असते. टपर्‍यांबरोबरच व्हॅन व तत्सम वाहनातूनही विक्री सुरू असते. सकाळी 7 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 वाजल्यानंतरही गुटखा व मावा खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडालेली असते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात सर्वाधिक संख्या देशाचे भविष्य असणार्‍या तरुणांची असते. तरुणांची टोळकी गुटखा व माव्याच्या टपर्‍यांवर केवळ अंधानुकरण म्हणून उभी असतात. एरव्ही रात्रीच्या वेळी दोन-चार लोक आपल्या घरासमोर उभारले तर का  उभारलाय? अशी विचारणा करणारे पोलिस गुटखा-माव्यासाठी जमलेल्या टोळक्यांना का हटकत नाहीत? असा सवालही नागरिकांतून विचारला जात आहे.