Fri, Nov 16, 2018 09:03होमपेज › Kolhapur › गुंडगिरी रोखण्यासाठी ‘गुंडास्कॉड’

‘गुंडाराज’ रोखण्यासाठी पोलिसांचे ‘गुंडास्कॉड’

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 11:26AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : दिलीप भिसे

शहरासह जिल्ह्यातील फाळकूटदादांची गुंडागर्दी, काळ्याधंद्याचे साम्राज्य मोडीत काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली ‘स्पेशल गुंडास्कॉड’ची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दोन महिला अधिकार्‍यांसह पंचवीस जवानांचा समावेश करण्यात आला आहे. संघटित टोळ्यांना पोसणार्‍या म्होरक्यांवर गुन्हेगारी कटाचा ठपका ठेवण्यात येत आहे. रेकॉर्डवरील 250 गुंडांच्या तडीपारीचेही टार्गेट देण्यात आले आहे.

शहरात फाळकूटांची मिजासखोरी वाढली आहे. किरकोळ कारणातूनही नंग्या तलवारी चकाकू लागल्या आहेत. वर्चस्वासाठी गुन्हेगारीचे प्रस्थ वाढू लागले आहे. कायद्याचा धाक आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. जवाहरनगर, सुभाषनगर, दौलतनगर, राजेंद्रनगर, लक्षतीर्थ वसाहत, सायबर चौक परिसरात काही नव्याने उदयाला आलेल्या टोळ्यांचा सर्वसामान्यांना त्रास सोसावा लागतो आहे. गर्दी, मारामारीच्या घटनांमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. टोळक्यांची भाईगिरी मोडीत काढण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर ‘स्पेशल गुंडास्कॉड’ची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित होत आहे. 

शहरात नुकत्याच झालेल्या खुनामुळे ही यंत्रणा आकाराला येत आहे. दोन निरीक्षक, दोन महिला सहायक, 25 पोलिसांचा समावेश करण्यात आला आहे. गुंडागर्दीसह काळेधंदे, तस्करांचे कारनामे, हुल्लडबाजी, छुपा वेश्या व्यवसाय, स्किल गेमच्या नावाखाली चालणार्‍या जुगारी अड्ड्यांवरील कारवाईचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरासह इचलकरंजी, शिरोळ, जयसिंगपूर, पेठवडगाव,  हातकणंगले, हुपरी, आजरा, चंदगड, गारगोटी परिसरातील गुंडागर्दी मोडीत काढण्यासाठी पथकाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत.