होमपेज › Kolhapur › दर घसरणीमुळे गूळ झाला कडू 

दर घसरणीमुळे गूळ झाला कडू 

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 08 2017 10:32PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील

कोल्हापूरी गुळाचा दर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. त्यामुळे शेतकरी आणि गुर्‍हाळमालक आतबट्ट्यात आले आहेत. हंगामाच्या पहिल्या टप्प्यातच दराची घसरण सुरू झाल्याने अडथळ्यांच्या शर्यतीतही टिकलेला हा पारंपरिक उद्योगच धोक्यात आला आहे. 

कोल्हापूर ही गुळाची मोठी आणि ख्यातनाम बाजारपेठ मानली जाते. इथली गुर्‍हाळघरे ही वैशिष्टपूर्ण आहेत. त्यामुळेच पंधरा-वीस वर्षांपूर्वी बाराशे गुर्‍हाळघरांची घरघर जिल्ह्यात सुरू होती; पण आता सततच्या समस्यांमुळे दोनशेच्या आसपास गुर्‍हाळघरे सुरू आहेत. गुर्‍हाळघरे हा शेतकर्‍यांचाच जोडउद्योग आहे. ऊस उत्पादकांना यंदा साखर कारखान्यांकडून टनाला तीन हजारांहून अधिक दर मिळत आहे. गुळाची परिस्थिती मात्र नेमकी उलटी झाली आहे. बाजारात सध्या 3000 ते 3700 प्रतिक्‍विंटल इतके खाली दर आले आहेत. मुळात बहुतांश गुळाचा सौदा हा 3 हजार रुपयांच्या आसपासच होत आहे. फारच दर्जेदार गूळ असेल तरच तीन हजार ते अगदी 4200 रुपयांचा दर मिळत आहे; पण असे प्रमाण पाच टक्के इतके कमी आहे. एकूणच सध्या गुळाचे मार्केट पूर्णपणे कोसळले आहेत. त्यामुळे गुर्‍हाळचालकांचे कंबरडे मोडले आहे. कारण, ऊस उत्पादकाला साखर कारखान्याच्या तोडीचा दर देणे अशक्य बनले आहे. दरच मिळत नसल्याने ऊस उत्पादकसुद्धा आता गुर्‍हाळघरांकडे पाठ फिरवू लागले आहेत. गुळात औषधी गुणधर्म आहे; पण गुळाचे मार्केटिंग होत नसल्याने सतत मागणी व पुरवठ्यात असंतुलन दिसते. याचाच फटका थेट गुळाला बसू लागलाआहे.

गुळाची बाजारपेठ
गुळाला गुजरात व राजस्थान ही मोठी बाजारपेठ आहे. कोल्हापुरी गुळापैकी 90 टक्के गूळ हा या राज्यांत विकला जातो. अत्यंत दर्जेदार गूळ निर्यात होतो; पण याचे प्रमाण सध्या 1 टक्‍का आहे. उर्वरित गूळ हा स्थानिक ठिकाणी विकला जातो. दुसर्‍या बाजूला काही ठिकाणी गूळ बनवण्याची पद्धत चुकीची वापरली जात असल्याने गुळाचा दर्जा कमी होत असल्याचे दिसते. त्यामुळे गुळाचा दर्जा वाढवण्यासाठीही एखादी सार्वत्रिक पद्धत अंमलात आणण्यासाठी अभ्यासकांनी मार्गदर्शन करायला हवे. गुळाला साखर हा पर्याय वाटत असला तरी गूळ वापरणारा वर्ग पूर्णपणे वेगळा आहे हे लक्षात घेऊन त्याचे मार्केटिंग करण्याची गरज आहे. यासाठी कोल्हापूर गुळाला पूर्वीसारखे वैभव मिळवण्यासाठी सर्वांनीच एकत्र येऊन कार्यक्रम ठरवण्याची गरज आहे.

गुर्‍हाळघर म्हणजे लघू उद्योग
अत्यंत कष्टाचा आणि स्थानिक रोजगार निर्माण करणारा गुर्‍हाळघरांचा उद्योग आहे. कारण, एका गुर्‍हाळात तीस माणसे कुटुंबासह काम करत असतात. यासह ट्रॅक्टर, ऊस उत्पादक, बैलगाडी आणि गूळ प्रक्रियेसाठी लागणारे पुरवठादार आदींनाही यामुळे व्यवसाय उपलब्ध होतो. 

पारंपरिक गुर्‍हाळघरे चालवणे जिकिरीचे बनले आहे. गूळ हा आयुर्वेदिक आहे. त्यामुळे हा व्यवसाय टिकला पाहिजे. या व्यवसायाला लघू उद्योग म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी आम्ही सतत शासनाकडे करत आहे. यंदा हा व्यवसाय पूर्णपणे संकटात सापडला आहे. त्यामुळे गुर्‍हाळचालकांना व शेतकर्‍यांना संघटित करून याबाबत निर्णय घेणार आहे.
- भगवान काटे (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

पारंपरिक गुर्‍हाळघरचालक हा शेतकरीच आहे. शेती परवडत नाही म्हणून तो गुर्‍हाळघरांच्या माध्यमातून उद्योग करण्यासाठी धोका पत्करून व्यवसाय करतो; पण या व्यवसायाला कसल्याही सोयी-सुविधा नाहीत. कसलीही हमी नाही. आता गुर्‍हाळघरे सुरू असताना दर एकदम खाली आले आहेत. हा उद्योग आतबट्ट्यात आला आहे; पण ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी स्थिती आमची झाली आहे.
 - अरुण पाटील (गुर्‍हाळचालक)