Sun, Jul 21, 2019 08:43होमपेज › Kolhapur › कोल्हापूरः म्होरक्यासह लुटारू सुरतला

कोल्हापूरः म्होरक्यासह लुटारू सुरतला

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 22 2018 1:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गुजरीत सराफावर हल्ला करून 40 लाखांचे दागिने लुटणार्‍या टोळीतील साथीदारांनी गुजरातमध्ये आश्रय घेतल्याने विशेष तपास पथकांनी सुरत, अहमदाबादकडे धाव घेतली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने बुधवारी पहाटे ठिकठिकाणी छापेही टाकले. मात्र, ठोस धागेदोरे हाती लागले नाहीत. गुन्ह्यातील मोटार कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

मुंबईतील सराफ कांतिलाल मेहता (वय 53, बोरिवली पूर्व) यांच्यावर लुटारूंनी हल्ला करून 40 लाखांचे दागिने लुटले होते. गुजरीतील जैन मंदिराजवळ दि. 7 फेब्रुवारीला पहाटे ही घटना घडली होती. मध्यवर्ती व्यापारपेठेत हा प्रकार घडल्याने कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी गुन्ह्यातील मोटारीसह टोळीचा छडा लावला होता. चौकशीअंती टोळीतील संशयित मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्‍न झाले होते. यलोगेट, कोळीवाड्यासह शिवडीत पोलिसांनी छापे टाकून त्यांचा शोध घेतला. कोल्हापूर पोलिसांचा सुगावा लागताच संशयित कुटुंबीयासह मुंबईतून पसार झाल्याने अधिकार्‍यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते.

पोलिसांनी यलोगेट, कोळीवाडा येथील खबर्‍यांना विश्‍वासात घेऊन टोळीचा मागमूस काढण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी सुरत,  अहमदाबादला आश्रय घेतल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने प्रत्यक्षात तेथे जाऊन काही ठिकाणी छापे टाकून शोधमोहीम राबविली; पण काही धागेदोरे हाती लागले नसल्याचे समजते.

टोळीचा म्होरक्या असलेल्या सराईताने सराफ व्यावसायिक कांतिलाल मेहता यांच्या दैनंदिन हालचालीची तीन आठवड्यांपूर्वी माहिती काढली होती. मेहता नेहमी प्रवास करीत असलेल्या लक्झरीतूनही म्होरक्याने एकवेळ पाठलाग केला होता, अशीही माहिती पुढे आली आहे.

लक्झरीमधील गर्दीमुळे कदाचित लूटमार करण्याचा बेत प्रसंगी अंगलटही येऊ शकतो, ही शक्यता गृहीत धरून साथीदारांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातून सात हजार रुपये भाडे देऊन नवी कोरी मोटार भाड्याने घेतली. गुन्ह्यात वापरलेली मोटारही तपासाधिकार्‍यांनी ताब्यात घेतली आहे. परवा मध्यरात्री ही मोटार कोल्हापूर येथे आणण्यात आली आहे.

कुटुंबीयांपाठोपाठ आता नातेवाईकांचाही गुंगारा
सराईत टोळीतील साथीदार कुटुंबीयांसह मुंबईतून पसार झाले होते. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांच्या नातेवाईकांकडे ससेमिरा लावला होता. तथापि, म्होरक्यासह आणखी एका सराईताच्या नातेवाईकांनीही कुटुंबीयासह पळ काढल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीला आल्याने अधिकारी, कर्मचारी बुचकळ्यात पडले आहेत.