Thu, Aug 22, 2019 10:14होमपेज › Kolhapur › अंकली पुलाचा संरक्षक लोखंडी कठडा धोकादायक

अंकली पुलाचा संरक्षक लोखंडी कठडा धोकादायक

Published On: Feb 10 2018 1:31AM | Last Updated: Feb 09 2018 11:38PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

सांगली-कोल्हापूर या दोन जिल्ह्यांसह कर्नाटकला जोडणारा आणि सुमारे 139 वर्षांपूर्वीचा अंकली जुना पुलाचा संरक्षक कठडा सध्या धोकादायक ठरला आहे. ब्रिटिशकालीन पूल सध्या भक्कम असला तरी दक्षिणेकडील लवचिक लोखंडी कठडा अपघाताला निमंत्रण देणारा आहे. 

एखादे भरधाव डंपर किंवा एस.टी.सारखे अवजड वाहन या लोखंडी कठड्याला धडक दिल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी महाड येथील सावित्री नदीवरील कोसळलेला पूल आणि 26 जानेवारीला कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून पंचगंगेत कोसळलेली मिनी बसचा अपघात पाहता त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे वाटते.

बिटिशकालीन पुलावरील अपघातानंतर अशा पुलांच्या भक्कमतेबाबत सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील सुमारे शंभरवर पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. शिरोळ तालुक्यातील पाच पुलांसह सर्वाधिक जुना असणार्‍या अंकली पुलाचेही ऑडिट झाले आहे. ब्रिटिशकालीन असलेला या उंच आणि भक्कम पुलावर कृष्णेचे महापुरात कधीही पाणी आलेले नाही. यावरून त्याची बांधणी लक्षात येते. या पुलालगत 1999 साली नवा पूल बांधण्यात आला आहे. मात्र, दोन्ही पुलावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. 
नवीन पूल बांधताना जुन्या अंकली पुलाचे रूंदीकरण करण्यात आले. त्या ठिकाणी सिमेंटचा कठडा बांधण्यात आला. मात्र, सध्या पुलाच्या उदगाव बाजूला सुमारे 30 ते 35 फूट सिमेंटचे कठडे नसून दोन्ही बाजूला लोखंडी अँगल मारून संरक्षक कठडे उभारण्यात आले आहेत. सध्या पुलाच्या पश्‍चिम बाजूकडील असलेला लोखंडी कठडा जीवघेणा ठरलेला आहे. एखादे वाहन नदीत कोसळल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग येणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. लोखंडी पाईप गायब तर झुडपे वाढल्याने भरधाव वाहनांना पुढील अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन सरळ नदीत कोसळू शकते. 
अंकली टोलनाका हा आंदोलकांचा नाका म्हणून ओळखला जातो. रास्ता रोको, चक्काजाम आंदोलनात सर्रासपणे आंदोलक लोखंडी कठड्यावर घाव घालतात. काहींनी लोखंडी कठडे कापून नेलेले आहेत. बांधकाम खात्याने जुजबी दुरुस्तीशिवाय काहीही केलेले नाही. गेल्यावर्षी पुलाच्या कठड्यावर मारुती कार लोखंडी कठडा तोडून नदीत कोसळता-कोसळता वाचली होती. तेवढाच भाग दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र, सध्या पुलाच्या पश्‍चिमेकडील लोखंडी कठडा धोकादायक ठरला आहे. त्याची दुरुस्ती तत्काळ व्हावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

‘ते’ घडीव दगड गेले कुठे?
सन 1999 ला अंकली पुलाजवळ नवीन पूल बांधण्यात आला. पुलावरील दोन्ही बाजूंचे ब्रिटिशकालीन घडीव दगडी असलेले संरक्षक कठडे काढून रात्रीत दगड गायब करण्यात आले. नव्या पुलावर टोल बसविल्याने वाहनधारकांनी जुन्या पुलावरील वाहतुकीला टोल नाकारला. त्यामुळे जुन्या पुलाचे काही तरी काम केल्याचे दाखविण्यासाठी रातोरात्र कठडा गायब करून सिमेंटचा कठडा बांधण्यात आला. ते घडीव दगड कुठे गेले, हे आजपर्यंत गुलदस्त्यात आहे. त्यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील हे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री होते.

ब्रिटिशकालीन पूल
उदगाव-अंकली जुन्या पुलाचे बांधकाम सन 1875 ते 78 या दरम्यान झाले आहे. या पुलाची लांबी 289.26 मीटर असून 11 गाळे आहेत. पुलाची उंची 22.60 मीटर तर प्रत्येक गाळ्यातील अंतर हे 21.33 मीटर आहे. या पुलाच्या पूर्वेला बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे बांधकाम 1999-2000 या सालात करण्यात आले तर या पुलालाही 11 गाळे आहेत.