Sun, Jul 21, 2019 12:24होमपेज › Kolhapur › ‘ग्रीन सिटी’ कागदावरच?

‘ग्रीन सिटी’ कागदावरच?

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 06 2018 12:12AMइचलकरंजी : प्रतिनिधी 

शहर ‘ग्रीन सिटी’ करण्यासाठी शासनाच्या अमृत योजनेतून तब्बल 1 कोटी 27 लाख रुपयांच्या निधीचा ठेका देण्यात आला. या योजनेंतर्गत शहरात 19 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मक्‍तेदारांनी जुलै 2017 मध्ये वृक्ष लागवड केली. पण, सध्या केवळ 6 हजार वृक्षच जगल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ‘ग्रीन सिटी’चा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. वृक्ष लागवड आणि संगोपनाची जबाबदारी मक्‍तेदारांची असताना त्यांनी दुर्लक्ष केल्यानंतरही नगरपालिकेने त्यांना बिल आदा करण्याची घाई का केली, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

शासनाच्या अमृत योजनेतून इचलकरंजी शहर ‘ग्रीन सिटी’ करण्यासाठी तब्बल 1 कोटी 27 लाख रुपयांचा ठेका देण्यात आला. मक्‍ता पद्धतीने 19 हजार वृक्ष लागवडीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पुण्याच्या मक्‍तेदारास 14 हजार झाडांसाठी 92 लाखांची तर सांगलीच्या मक्‍तेदारास 5 हजार झाडांसाठी 35 लाखांची निविदा मंजूर करण्यात आली. 

पुण्याच्या मक्‍तेदाराने लावलेल्या 14 हजार वृक्षांपैकी 9200 वृक्ष आणि सांगलीच्या मक्‍तेदाराने लावलेल्या 5 हजार वृक्षांपैकी 3700 वृक्ष जगलीच नसल्याची धक्‍कादायक माहिती काँग्रेसच्या नगरसेवकांनी उघडकीस आणली. निविदेतील अटी आणि शर्थीचा भंग केल्यामुळे मक्‍तेदारांना बिले आदा करू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, नगरपालिकेने पुण्याच्या मक्‍तेदारास 40 लाख आणि सांगलीच्या मक्‍तेदारास 23 लाख रुपये आदा केले आहे. 

वास्तविक वृक्ष लागवड केल्यानंतर त्याची देखभाल करण्याची अट घातली असताना मक्‍तेदाराने झाडांच्या संगोपनाकडे आणि त्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी लाखो रुपयांचा निधी खड्ड्यात गेला आहे.