Tue, May 21, 2019 12:08होमपेज › Kolhapur › ग्रामसभा न घेतल्यास ग्रामसेवकांवर कारवाई

ग्रामसभा न घेतल्यास ग्रामसेवकांवर कारवाई

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 26 2018 1:06AMकोल्हापूर : प्रतिनिधी

26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर या चार तारखांना ग्रामसभा घेण्याचा शासन नियमच असून, त्याचे पालन करणे ग्रामसेवकांना बंधनकारक आहे. त्यामुळे 26 जानेवारीच्या ग्रामसभेला ग्रामसेवकांनी उपस्थित राहावे, अन्यथा कारवाई केली जाईल. शिवाय, ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीत सभांचा इतिवृत्तांत सरपंचाकरवी ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांनी जि.प.कडे पाठवावा, असे लेखी आदेश जि.प. सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी गटविकास अधिकार्‍यांना काढले आहेत. 

26 जानेवारी ही शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी ग्रामसभांवर बहिष्कार टाकत असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने निवेदनाद्वारे जि.प.ला कळवले. दरम्यान, जि.प. कर्मचारी सोसायटी संलग्‍न असलेल्या ग्रामसेवक संघटनेने मात्र आपला बहिष्कार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्रामसेवक संघटनांमध्ये फूट पडली असून, निम्मे ग्रामसेवक प्रजासत्ताक दिनी होणार्‍या ग्रामसभांना उपस्थित राहणार आहेत. निम्म्यापेक्षा जास्त ग्रामसेवक हजर राहणार असल्याने सभांवर फारसा परिणाम होणार नाही.

ग्रामसभा घेणे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 7 व ग्रामपंचायत अधिनियम 1959 अन्वये वित्तीय वर्षात चार ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मे या तारखांना घेणे बंधनकारकच आहे, फक्‍त यात 2 ऑक्टोबरची सभा 2 ते 9 ऑक्टोबर यादरम्यान कधीही घेता येऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 26 जानेवारीच्या सभेवर बहिष्कार टाकणे हा ग्रामसेवकांचा शिस्तभंग ठरणार असल्याने त्याप्रमाणे कारवाईही होणार आहे.