Mon, May 20, 2019 20:05होमपेज › Kolhapur › स्वातंत्र्य दिनी गावसभा होणार कागदोपत्रीच?

स्वातंत्र्य दिनी गावसभा होणार कागदोपत्रीच?

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 12 2018 11:31PMबानगे : रमेश पाटील

गावचा कारभार सर्व ग्रामस्थांना समजण्यासाठी सरकारने वर्षातून चार वेळा म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर, 1 मे रोजी गावसभा बंधनकारक केल्या आहेत. या चार ग्रामसभांपैकी यापूर्वी 1 मे व 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभा बहुतांशी ग्रामपंचायती कागदोपत्रीच घेतल्या. चार पैकी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या ग्रामसभा ध्वजारोहण झाल्यानंतर लगेचच व्हायच्या व चार ते पाच तास विविध विषयांवर गाजायच्या. गतसालापासून ग्रामसेवक संघटनांनी या दोन ग्रामसभेत प्रचंड गोंधळ होतो म्हणून 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दिवसाऐवजी इतर कोणत्याही दिवशी सदर सभा घ्याव्यात, अशी मागणी केली असल्याने आता उपस्थितीऐवजी या सभा कागदोपत्रीच होण्याची भीती आहे. 

ग्रामीण भागात बहुतांशी गावात 15 ऑगस्ट दिवशी ग्रामस्थ आपली शेतीतील कामे बंद करून स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात. कारण या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषण स्पर्धा, ढोल वादन स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ, इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. शिवाय, ग्रामसभेची माहिती याच दिवशी सर्व ग्रामस्थांना समजते म्हणून काही गावामध्ये पाळकही पाळला जातो. मात्र, ग्रामसभा यापुढे इतर कोणत्याही दिवशी घेतल्यास या ग्रामसभांकडे ग्रामस्थ पाठ फिरवणार आहेत. तरी ग्रामसभा 15 ऑगस्ट दिवशीच व्हाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. 

1 मे व 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभा प्रत्यक्षात न घेता काही ग्रामपंचायतींनी गावच्या नागरिकांना ग्रामपंचायतीमध्ये बोलवून प्रोसिडिंगला सह्या घेतल्या आहेत. असे नागरिक सांगत आहेत. आता 15 ऑगस्ट व 26 जानेवारीच्या सभा इतर दिवशी घेतल्या तर या चारही सभा यापुढे कागदोपत्रीच होण्याची शक्यता आहे. कारण इतर दिवशी ग्रामसभेला नागरिक उपस्थित राहणारच नाहीत. हा सर्वांनाच अनुभव आहे.

15 ऑगस्ट, 26 जानेवारी रोजीच सभा व्हाव्यात

15 ऑगस्ट रोजी सर्व ग्रामस्थ ग्रामसभेला हजर असतात म्हणून ग्रामसभा 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजीच व्हाव्यात, असे सोनगे (ता. कागल) येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष व माजी ग्रामसेवक श्रीपती देवडकर म्हणाले.