Mon, Jul 22, 2019 02:53होमपेज › Kolhapur › 468 उमेदवार निवडणुकीसाठी होणार अपात्र 

468 उमेदवार निवडणुकीसाठी होणार अपात्र 

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 25 2018 11:44PMकोल्हापूर : प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या 468 उमेदवार पुढील निवडणुकीसाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकींचा मुदतीत खर्च सादर न केल्याने ही कारवाई करण्यात येणार आहे.  जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये 478 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीत 15 हजारांवर उमेदवार रिंगणात उतरले होते. निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना निकालानंतर महिन्याभरात निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. मात्र; जिल्ह्यातील 468 जणांनी हे खर्चच सादर केलेले नाही. याप्रकरणी संबंधितांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवले जाणार आहे. त्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

वेळेत खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांची तालुकानिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या उमेदवारांची जिल्हाधिकार्‍यांसमोर सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणी नंतर जिल्हाधिकारी अपात्रतेबाबत निर्णय देणार आहेत.

वेळेत खर्च सादर न केल्यास संबधितांना जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय दिलेल्या तारखेपासून पुढे पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी आहे. यामुळे संबधितांना किमान दोन निवडणूका लढवता येत नाहीत. जिल्ह्यातील या सर्व 468 उमेदवारांबाबत असाच निर्णय होण्याची शक्यता अधिक आहे.

निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांत सर्वाधिक 139 उमेदवार भुदरगड तालुक्यातील आहेत. शाहूवाडीतील 122 तर हातकणंगले तालुक्यातील 73 उमेदवार आहेत. राधानगरी व करवीर तालुक्यातील प्रत्येकी 48, कागलमधील 38 तर गडहिंग्लजमधील 7 उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यातील सर्व उमेदवारांनी मुदतीत खर्च सादर केल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.