Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Kolhapur › पानसरे हत्या : अंदुरे, कळसकरची चौकशी

पानसरे हत्या : अंदुरे, कळसकरची चौकशी

Published On: Aug 22 2018 12:56AM | Last Updated: Aug 22 2018 12:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी जेरबंद झालेल्या शूटर सचिन अंदुरे व साथीदार शरद कळसकर याच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदारे हाती लागत असल्याने एसआयटीनेही चौकशीची व्याप्ती अधिक गतिमान केली आहे. ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी दोघांकडे चौकशी करण्यात येत आहे. महत्त्वाचे दुवे हाती लागण्याची शक्यता असल्याचे मंगळवारी वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या कटात अंदुरे, कळसकरचा सहभाग असावा, असा एसआयटीचा संशय आहे. त्यामुळे तपास पथकातील अधिकारी दोन दिवसांपासून एटीएस, सीबीआयच्या संपर्कात होते. मंगळवारी दुपारी एसआयटीच्या अधिकार्‍यांनी दोघांकडे काही काळ चौकशी केली. 

कर्नाटक सीआयडी, एटीएससह सीबीआय पथकातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी समन्वय ठेवण्याची दक्षता घेतली आहे. कळसकरचे चार वर्षे कोल्हापूरसह जिल्ह्यात वास्तव्य होते. या काळातील त्याचे लोकेशन, त्याचे स्थानिक साथीदार, कोणत्या ठिकाणी त्याची खोली होती. त्याच्याकडे कोणाचे ये-जा होती. मुंबई, पुणे, नालासोपारा येथील सहकार्‍यांशी त्याचा संपर्क होता का? याचीही माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कॉ. पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तपास यंत्रणा कार्यरत असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे स्पष्ट करीत येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असाही विश्‍वास वरिष्ठ सूत्राकडून व्यक्त करण्यात आला.


....................................................