Sat, Jun 06, 2020 19:39होमपेज › Kolhapur › पानसरे हत्येचा कट कोल्हापुरात शिजला

पानसरे हत्येचा कट कोल्हापुरात शिजला

Published On: Sep 17 2018 1:22AM | Last Updated: Sep 17 2018 1:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी मारेकर्‍यांनी हत्येआधी दीड वर्षापूर्वी कोल्हापुरात कट रचला होता, अशी माहिती सीबीआय, एसआयटी चौकशीत निष्पन्न झाल्याचे रविवारी विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. ‘मिशन फत्ते’ची जबाबदारी सोपविलेल्या शार्पशूटर्सना पिंपरी-चिंचवड येथील अमोल काळेने जिवंत काडतुसे व पिस्तूल पुरविल्याचे उघड झाल्याचे समजते. 
हत्येपूर्वी शार्पशूटर्सना कर्नाटकातील बंगळूर, बेळगावमध्ये प्रशिक्षण दिल्याची माहिती पुढे आली आहे. हत्येमागे डॉ. वीरेंद्रसिंह तावडेशिवाय आणखी एक बडा मास्टरमाईंड अजूनही पडद्याआड दडून राहिला असावा, असा संशय तपास यंत्रणांतील  वरिष्ठाधिकार्‍यांना आहे. कथित मास्टरमाईंडविरोधात भक्कम आणि सबळ पुरावा शोधण्यासाठी वरिष्ठस्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत, असेही सूत्रांकडून समजते.

कॉ. पानसरे हत्येतील संशयित अमोल काळेला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीच्या हालचाली सुरू आहेत. सीबीआय न्यायालयानेही मारेकर्‍याचा एसआयटीकडे ताबा देण्यास दोन दिवसांपूर्वी अनुमती दिली आहे. त्या आदेशाची प्रतही एसआयटीला उपलब्ध झाली आहे. अमोल काळेला लंकेश गौरी हत्येप्रकरणी कर्नाटक एटीएसने सर्वप्रथम अटक केली आहे. मंगळवार अथवा बुधवारी त्याचा ताबा शक्य असल्याचेही एसआयटी सूत्रांकडून समजते.

कळसकर वेगवेगळ्या नावाने कोल्हापुरात

कट रचण्यासाठी पुणे आणि कोल्हापुरात संशयितांची सतत ऊठबस चालत होती. नोकरीच्या निमित्ताने कळसकरचे कोल्हापुरात साडेचार वर्षे वास्तव्य होते. वेगवेगळी नावे धारण करून त्याने  उद्यमनगर व कळंबा येथे दोन खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. उद्यमनगर येथील खोलीचा स्वत: विश्रांतीसाठी, कळंबा येथील खोलीचा मात्र मित्रासाठी वापर केला जात होता.

25 ते 30 साथीदार कळसकरच्या संपर्कात

संशयित काळे, सचिन अंदुरे, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, परशुराम वाघमारेसह 20 ते 25 सहकारी मित्र  कळसकरच्या संपर्कात होते. सर्वांची कळंबा परिसरातील खोलीवर ऊठबस होती. या खोलीतच कॉ. पानसरे हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे आली आहे, असेही समजते.
डॉ. तावडेच्या सूचनेनुसार विविध ठिकाणची केली रेकी

डॉ. तावडेच्या सूचनेनुसार अमोल काळेने कळसकरच्या मदतीने कॉ. पानसरे यांचे निवासस्थान, त्यांचा येण्या-जाण्याच्या, मॉर्निंग वॉकचा मार्ग तसेच बिंदू चौक येथील भाकप कार्यालय परिसराचीही संशयिताने रेकी केली होती, अशीही माहिती पुढे आली आहे.