Sat, Apr 20, 2019 08:50होमपेज › Kolhapur › 'पानसरेंचे खूनी सापडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा' (Video)

'पानसरेंचे खूनी सापडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा' (Video)

Published On: Feb 20 2018 2:03PM | Last Updated: Feb 20 2018 2:03PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला 20 फेबु्रवारी रोजी तीन वर्षे पूर्ण झाली. तरीही अद्याप त्यांचे मारेकरी मोकाट फिरत आहेत. या प्रकरणातील फरारी आरोपी विनय पवार, सारंग अकोळकर तसेच सूत्रधारांना त्वरित अटक करावी, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी कॉ. गोविंद पानसरे समता संघर्ष समिती आणि सर्व पुरोगामी संघटना, पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर रास्ता रोको, सत्याग्रह आणि जेलभरो आंदोलन करण्यात आले. 

कॉ. पानसरे यांचा खून होऊन तीन वर्षे झाली. या प्रकरणातील आरोपींविरोधात पुरावे असूनही त्यांना अटक झालेली नाही. हे सरकारचे अपयश असून त्याच्या निषेधार्थ सर्व डाव्या आणि पुरोगामी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना अटक करा, नाहीतर आम्हाला तरी अटक करा, अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध केला.

‘आम्ही सारे पानसरे’, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍याना अटक करा’, ‘लढेंगें-जितेंगे’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर  संतप्त भावना व्यक्‍त केल्या. कॉ. पानसरेंच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण होऊनही त्यांच्या मारेकर्‍यांचा शोध लागत नाही, याचा कॉ. उमा पानसरे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. त्या म्हणाल्या, हे भाजप सरकारचे अपयश असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. या खुनातील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करावी.

माजी आमदार संपतबापू पवार-पाटील म्हणाले, या खुनातील खर्‍या मारेकर्‍यांना शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. यासाठी भविष्यात मोठ्या ताकदीनीशी लढा उभारणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यावे. 

कॉ. नामदेव गावडे म्हणाले, पोलिसांच्या अपुर्‍या तपासामुळे संशयित आरोपींना जामीन मिळाला. यामागे मोठे षड्यंत्र आहे. आज सरकारची सर्व आश्‍वासने फोल ठरत आहेत. अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. मुख्य सूत्रधारांना अटक होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला.

पानसरेंच्या खुनातील आरोपींची नावे पोलिसांना देऊनही ती जामिनावर सुटतात कसे? असा सवाल कॉ. चंद्रकांत यादव यांनी उपस्थित केला. समाजात भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. जनतेच्या प्रश्‍नांबाबत सरकारची नाकर्तेपणाची भूमिका आहे. 

सर्वसामान्यांना सोबत घेऊन दीर्घ  मुदतीचा लढा उभारण्याचा निर्धार कॉ. यादव यांनी केला.

दलितमित्र व्यंकाप्पा भोसले म्हणाले, कॉ. पानसरे हे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढले. त्यांनी लोकशाही, घटना समाजाला पटवून दिले. पण त्यांचे विचार सनातनी लोकांना मान्य नव्हते. म्हणूनच त्यांचा विचार दाबवण्यात आला. खुनातील आरोपींना शोधण्याऐवजी पुरावा नाही म्हणून त्यांना सोडण्यात आले. ही लढाई विचारांची आहे. सर्व घटना अबाधित ठेवण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल. 

कॉ. अतुल दिघे म्हणाले, कॉ. पानसरे हे जातीवाद, रुढीवाद विरोधात बोलत होते. देशाच्या हिताबद्दल बोलणार्‍यांवर गोळ्या झाडतात. हे सर्व आरोपी आज मोकाट फिरत आहे, ही खेदजनक बाब आहे.

हसन देसाई यांनी राज्य व केंद्र सरकारचा निषेध केला. हे सरकार सर्वसामान्यांचे नाही. कॉ. पानसरे यांच्या खुनाला वाचा फोडण्यासाठी सर्वांची एकी झाली पाहीजे. कॉ. सतीशचंद्र कांबळे म्हणाले, सनातन संस्थेची चौकशी करुन त्यावर बंदी घालावी. यापुढचे आंदोलन तीव्र करुन जेलमध्ये जाऊन जामीनच घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी गिरीष फोंडे यांनीही विचार मांडले.    

यावेळी कॉ. टी. एस. पाटील, बाजीराव खाडे, उमेश सुर्यवंशी, प्रसाद कुलकर्णी,  आरती रेडेकर प्रशांत आंबी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

मोठा पोलिस बंदोबस्त...

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. सीआरपीएफ, पोलिस अधिकारी तसेच साध्या गणवेशातील पोलिस आणि होमगार्ड याठिकाणी बंदोबस्ताला होते.  

भर उन्हात आंदोलन...

कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍यांना अटक करावी, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी भर उन्हात  रास्ता रोको केला. तासभर कार्यकर्त्यांनी उन्हात बसून सरकारचा निषेध नोंदविला. भर उन्हातही आंदोलनकर्त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता.