Tue, Mar 19, 2019 09:34होमपेज › Kolhapur › ‘सीबीआय’च्या दणक्याने ‘एसआयटी’च्या आशा पुन्हा पल्लवित

‘सीबीआय’च्या दणक्याने ‘एसआयटी’च्या आशा पुन्हा पल्लवित

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 19 2018 1:27AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ने अखेर मारेकर्‍याचा छडा लावला. औरंगाबाद येथून सचिन अंधुरेला अटक केल्याने ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे हत्येचा तपास करणार्‍या‘एसआयटी’च्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. पुरोगामी चळवळीतील नेत्यांच्या हत्येमागे दडलेल्या मास्टर माईंडचा लवकरच छडा लागेल, असा विश्‍वास शनिवारी रात्री वरिष्ठ सुत्रांनी व्यक्‍त केला.

डॉ. दाभोळकर यांच्या हत्येनंतर पुरोगामी चळवळीत संतापाची लाट उसळलेली असतानाच मारेकर्‍यांनी ज्येष्ठ कामगार नेते कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर प्रतिभानगर परिसरात गोळ्या झाडल्या.त्यात पानसरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेतील कॉ. पानसरे यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती.

 मारेकरी अद्यापही पसार !

डॉ. दाभोळकर, कॉ. पानसरे हत्येमागील मास्टरमाईंडचा तपास यंत्रणांनी छडा लावावा, अशी मागणी सर्वस्तरातून होत होती.  कॉ. पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने सनातनचा साधक समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला अटक केली होती. मात्र, अन्य संशयित सारंग अकोलकर, विनय पवार अद्याप पसार आहेत.

मास्टरमाईंड कोण?

 पुरोगामी नेत्यांच्या हत्येचा मास्टर माईंड कोण? याच्या भोवतीच तपास यंत्रणांचा तपास घुटमळत असतानाच दोन आठवड्यांपूर्वी एटीएसने नालासोपारा येथे छापा टाकून स्फोटकासह देशी बॉम्बसाठा हस्तगत केला. शिवाय वैभव राऊत, शरद कळसकरसह तिघांना जेरबंद करण्यात आले होते.तीनही संशयित वेगवेगळ्या संघटनांशी संबंधित असल्याने तपास यंत्रणांनी चौकशीची व्याप्ती वाढविली होती.

संशयाचे काहूर अधिक गडद

 संशयित कळसकरचे कोल्हापूर येथील उद्यमनगर परिसरात चार वर्षांहून अधिककाळ वास्तव्य असल्याचे उघड झाल्याने संशयाचे काहूर अधिक गडद बनले होते.त्यामुळे संशयिताच्या चौकशीतून कॉ. पानसरेंसह डॉ.दाभोळकर हत्येचे कनेक्शन उघडकीला येण्याचा दाट संशय होता. अखेर नेमके तेच घडले.

पुरोगामी चळवळीचे तपासाकडे लक्ष

 वैभव राऊतचा औरंगाबाद येथील साथीदार सचिन अंधुरेला सीबीआयने शनिवारी रात्री उशिरा अटक केल्याने पुरोगामी चळवळीचे तपासाकडे लक्ष लागले आहे. कॉ.पानसरे हत्येचा तपास करणारी ‘एसआयटी’ची यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली आहे.  वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनीही या वृत्तास रात्री उशिरा दुजोरा दिला.