Mon, Aug 19, 2019 05:05होमपेज › Kolhapur › दहा लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज शासन भरणार

दहा लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज शासन भरणार

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 1:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उद्योग उभारणीला पाठबळ देण्यासाठी व तरूणांना स्वावलंबी बनवण्यासाठी  राज्यात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मुद्रा बँक योजनेतून घेतलेल्या  10 लाख रूपयांपर्यंतच्या कर्जाचे संपूर्ण व्याज शासनामार्फत भरण्याची नवी योजना राबवण्यात येणार  असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.  26 जानेवारी पासून या नवीन योजनेची सुरवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय कृत बँकांकडून किमान कर्ज उपलब्ध मिळवण्यासाठी मुद्रा बँक योजना समन्वय समिती कोल्हापूर  आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुद्रा महामेळाव्यात ते बोलत होते. या 25 हजाराहून अधिक अर्जांची विक्री झाली,   रात्री उशिरा पर्यंत 9 हजार अर्ज प्राप्त झाले होते. 

ना. पाटील म्हणाले, 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या तरुण-तरुणींना व्यवसाय व उद्योग उभारण्यासाठी मुद्रा बँक योजनेतून घेतलेल्या 10 लाखांपर्यंतच्या कर्जाचे संपूर्ण व्याज शासनामार्फत व्याज परतावा योजनेतून त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या योजनेतून दहा हजार तरुणांना एक हजार कोटींच्या कर्जाचे होणारे 6 लाखांचे व्याज  शासनामार्फत परतावा योजनेतून लाभार्थीच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील तरुण-तरुणींना स्वत:च्या पायावर उभा राहण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी मुद्रा बँक ही योजना सुरू केली असून, त्याचा लाखो तरुण आज लाभ घेत आहेत. या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी झाली असून, महाराष्ट्र देशात या योजनेत तिसर्‍या क्रमांकावर आहे.  कोल्हापूर जिल्हाही तिसर्‍या क्रमांकावर आहे.  महाराष्ट्रात दरवर्षी 16 हजार नोकर्‍या निर्माण होतात. पण, भविष्यात नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे निर्माण व्हावेत यासाठी ही योजना फायद्याची आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या तरुण-तरुणींच्या बाबतीत बँकांनी पालकत्वाची भूमिका घ्यावी. नवउद्योजकांना व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मदत व मार्गदर्शन करण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. 

खासदार धनंजय महाडिक यांनी जीवनात यशस्वी उद्योजक होण्यासाठी स्वप्न बाळगणार्‍या लाखो तरुणांना पाठबळ देण्याचे काम मुद्रा योजनेतून होत आहे, असे सांगितले. अमल महाडिक यांनी  तरुणांशी संवाद साधून योजनेबाबत असणार्‍या समस्यांचे निरसन केले.  

या महामेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आले.  या मेळाव्याला जिल्ह्यातील 25 हजाराहून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता. सकाळपासूनच शिवाजी स्टेडिअम येथे तरुणांची गर्दी झाली होती. योजनेत सहभागी 32 बँकांकडून या मेळाव्याचे नेटके संयोजन करण्यात आले होते.  जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी स्वागत केले. माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी प्रास्ताविक केले. आभार सहायक संचालक एस. आर. माने यांनी मानले. 

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, अग्रणी बँकेचे अधिकारी राहुल माने, प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी आदी उपस्थित होते.
मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे : ना. पाटील


यावेळी मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे, ही शासनाची प्रामाणिक भूमिका आहे. आरक्षणाबाबत न्यायालयात केस सुरू आहे. शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ना. चंद्रकात पाटील यांनी सांगितले.