Sun, Jun 16, 2019 02:32होमपेज › Kolhapur › गोकुळ संचालकांवर कारवाईचे धाडस सरकारने दाखवावे

गोकुळ संचालकांवर कारवाईचे धाडस सरकारने दाखवावे

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शासकीय आदेशानुसार दूध दर न देणार्‍या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळावर कारवाईचे धाडस सरकारने दाखवावे, असे आव्हान आ. सतेज पाटील यांनी गुरुवारी दिले. गरज नसताना नोकरभरतीची प्रक्रिया सुरू असून, त्यामुळे संघावर वर्षाला सुमारे अकरा कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही भरती पारदर्शी होणार का, असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

आ. पाटील म्हणाले की, गायीच्या दुधाला 27 रुपये प्रतिलिटर दर देण्याबाबत सरकारने आदेश काढला आहे. तरीही राज्यातील अनेक संघ 22 ते 25 रुपयांपर्यंतच दर देत आहेत. त्यात गोकुळचाही समावेश आहे. याबाबत यापूर्वीच संघाला नोटीस बजावण्यात आली होती; पण कार्यवाही न झाल्याने अखेर संचालक मंडळालाच जबाबदार धरण्यात आले आहे. दर कमी देण्याची चूक संघ आणि संचालकांनी केली आहेच, आता खर्‍या अर्थाने या संचालक मंडळावर कारवाई करण्याचे धाडस सरकाने दाखवावे. नोटीस काढण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे.ते म्हणाले की, दुधाला दरवाढ दिली, तर त्याचा फायदा सर्वसामान्य दूध उत्पादकांना होणार आहे. नोकर भरतीतून काही जणांचेच भले होणार आहे. अशातच ही नोकरभरती पारदर्शक होईल का, याचीदेखील सर्वसामान्यांना काळजी आहे. नोकरभरतीसाठी सरकारकडे परवानगी मागताना संघाने 2020 पर्यंत प्रतिदिनी 20 लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार 429 पदे भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गायीच्या दुधाला दरवाढ देणे शक्य होत नसेल, तर वाढणार्‍या संकलनासाठी नोकरभरतीचा खर्च कसा पेलणार, याचे उत्तर संचालक मंडळाने देणे आवश्यक आहे. भरती कशारीतीने होते, याचा अनुभव जिल्ह्याला आहे. पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्रयस्थ संस्थेमार्फत भरती करून पारदर्शीपणाचा आदर्श घालून दिला आहे. तसा गोकुळकडून अनुभव सभासदांना अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.गोकुळच्या संचालक मंडळाचा एकूणच कारभार संशयास्पद असून, त्याबाबत आपण विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी तीन महिन्यांत चौकशी करू, असे सांगितले होते. त्याबाबत त्यांना याच महिन्यात स्मरणपत्र दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले. संचालक मंडळाच्या सहलीवर होणार्‍या खर्चावर मर्यादा घालण्याची मागणी आपण केली होती, तरीही सहली सुरूच असल्याने याबाबत आता ठोस कारवाईचीच मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहा संस्था ठराव द्या, एक कर्मचारी लावा : देवकर यांचा आरोप

संघात रोजंदारीवर काम करणार्‍यांना प्रथम कायम नोकरी द्या, अशी मागणी जि.प.चे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, गोकुळच्या निवडणुकीसाठी दहा संस्थांचे ठराव द्या आणि एक कर्मचारी संघात लावा, असा फतवा संचालक मंडळाने काढल्याची चर्चा आहे. याचाच अर्थ संघाच्या भल्यासाठी नव्हे, तर केवळ राजकीय स्वार्थासाठी नोकर भरतीचा प्रस्ताव पुढे आणला आहे. कृष्णा दूध संघाकडून उत्पादकांना 85 टक्के परतावा दिला जातो. गोकुळकडून यापेक्षा कमी परतावा दिला जातो, पण आता तर तो 70 टक्क्यांपर्यंत देण्याबाबत अध्यक्षांकडून बोलले जात आहे. अध्यक्षांनी एकदा हा निर्णय जाहीर करावाच, त्याच्या निषेधार्थ उत्पादक गायी-म्हशींसह त्यांच्या निवासस्थानाच्या दारात जाऊन बसतील.

गायीच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये देऊन त्याची विक्री 42 रुपयांना आणि म्हशीच्या दुधाला उत्पादकाला प्रतिलिटर 36 रुपये देऊन विक्री मात्र 54 रुपयांना केली जाते. खरेदी आणि विक्रीच्या दरातील हा फरक पाहता संघाला किती फायदा होतो, याचा अंदाज येतो. तरीही संचालक मंडळाकडून दूध उत्पादकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही देवकर यांनी केला. या संचालकांनी पाच गायींचे पालन करून दाखवावे, मगच उत्पादन खर्चावर बोलावे, असेही त्यांनी आव्हान दिले.

Tags : Kolhapur, government,  should, show, courage,  act,  Gokul directors