Tue, May 21, 2019 18:09होमपेज › Kolhapur › दोन कोटी विद्यार्थ्यांना पालकांसह विमाकवचः तावडे (Video)

दोन कोटी विद्यार्थ्यांना पालकांसह विमाकवचः तावडे (Video)

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 14 2018 1:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील दोन कोटी विद्यार्थ्यांचा विमा उतरवून त्याचे संरक्षण विद्यार्थ्यांना व पालकांनाही दिले जाईल. आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे शिक्षण थांबवावे लागल्यास, विमा कंपनीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचे पदवीपर्यंचे शिक्षण मोफत होईल, अशी घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली. नूल (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.

दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनाचा शानदार सोहळा झाला. नूलमध्ये तीन मजली सांस्कृतिक हॉल बांधण्याची घोषणा करत, येत्या दोन वर्षांत ‘पुढारी’कारांच्या कल्पनेनुसार नूलचा सर्वांगीण विकास केला जाईल, असे आश्‍वासन पाटील यांनी दिले.

इंटरनॅशनल एज्यु. बोर्ड स्थापणार : तावडे

सतत परीक्षेत अपयश येणार्‍याच्या माथी नापासाचा शिक्‍का लागू नये, म्हणून त्या विद्यार्थ्याला कौशल्याधारित शिक्षण देण्याचा विचार सुरू असल्याचे जाहीर करताना, महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे महाराष्ट्रात केवळ पुस्तकी आणि कालबाह्य शिक्षणाऐवजी मुलांना जीवनोपयोगी शिक्षण दिले जाईल, असेही तावडे यांनी सांगितले.

‘पुढारी’ हे सामाजिक व्यासपीठ
तावडे यांनी आपल्या भाषणात डॉ. ग. गो. जाधव, इंदिरादेवी जाधव आणि ‘पुढारी’ यांच्या सामाजिक तसेच स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. ‘पुढारी’ हे केवळ एक वृत्तपत्र नव्हे, तर सामाजिक व्यासपीठ आहे, असे ते म्हणाले.

सध्याची शिक्षणपद्धती केवळ पाठांतरावर आधारित असून, ती कालबाह्य झाली आहे. त्यामुळे त्यात बदल करून, विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनाशी निगडित असे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, यासाठी सरकारने गेल्या तीन वर्षांत अनेक निर्णय घेतले, शिक्षणपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करून कृतिशील शिक्षणावर भर देणे हेच यामागचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. या नव्या पद्धतीमुळे गेल्या वर्षी सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून मराठी माध्यम स्वीकारले, असेही त्यांनी सांगितले. 

वर्षानुवर्षे एका इयत्तेत शिकवल्या जाणार्‍या गोष्टीचा पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमात मागमूसदेखील नसतो. त्यामुळे केवळ पुढचे पाठ आणि मागचे सपाट अशी विद्यार्थ्यांची अवस्था होते. परिणामी, ‘नीट’सारख्या परीक्षेत आपले विद्यार्थी मागे राहतात. असे होऊ नये म्हणूनच सरकारने महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड स्थापन केले आहे, असे सांगत लडाखसारख्या ठिकाणी स्वतःची शिक्षणपद्धती विकसित करून मुलांना प्रात्यक्षिकाद्वारे अधिक चांगले शिक्षण देणारे सोनम वांगचूक यांनी या बोर्डाचे संचालकत्व स्वीकारले असल्याचे तावडे यांनी सांगितले.

नापास हा शब्द नसेल

शिक्षण क्षेत्रातील बदलांबाबत केलेल्या प्रयत्नांची माहिती देताना तावडे म्हणाले की, दहावीमध्ये पहिले आलेल्यांचे प्रचंड कौतुक होते. मात्र, अपयश आलेल्यांना सतत टोमणे खावे लागतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना नैराश्य येते आणि परिणामी ते गुन्हेगारी विश्‍वाकडे ओढले जाऊ शकतात. आपण स्वतः 14 नापास मुलांकडून त्यांना आलेल्या अपयशाच्या कारणांची माहिती घेतली आणि नापास झालेल्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून निकालानंतर लगेचच फेरपरीक्षा घेऊन निकालदेखील लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुलांचे वर्ष वाचले. फेरपरीक्षेतदेखील यश मिळवता न आलेल्या मुलांचा बौद्धिक कल कोणत्या क्षेत्रात आहे, त्यांचे कौशल्य कशात आहे, याची चाचणी घेऊन कौशल्य विकास कार्यक्रमाला प्रवेश दिला. यापुढे विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेत नापास हा शब्ददेखील नसेल, असेही त्यांनी सांगितले.

विम्याद्वारे शिक्षणाची व्यवस्था

आई अथवा वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर आर्थिक भार पेलवण्यासारखा नसल्याने अनेक मुलांचे शिक्षणच बंद होते. आता अशी परिस्थिती येऊ नये, म्हणून विमा योजनेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत केले जाईल, असे सांगत तावडे म्हणाले, दरवर्षी दोन कोटी विद्यार्थ्यांचा विमा सरकारच्या वतीने काढला जाईल. त्याद्वारे विद्यार्थ्याला त्याचे संरक्षण मिळेलच; पण त्याच्या पालकालाही त्याचे संरक्षण मिळेल. आई अथवा वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यास पुढच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च विमा कंपनीकडून केला जाईल. याबाबत विविध विमा कंपन्यांशी बोलणी सुरू असून, लवकरच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांनी बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी अनेक अडचणींचा सामना करून सोयीसुविधा निर्माण केल्या. त्यांचाच आदर्श घेऊन बहुजनांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मात्र, त्यातही विरोधकांकडून राजकारण आणले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. फी, भरती तसेच प्रवेश प्रक्रियेचे नियम न बदलता एखादी खासगी कंपनी शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करत असेल, तर त्यात काय चुकीचे आहे, अशी विचारणा करतानाच विरोधक मात्र याचा चुकीचा अर्थ काढून पालकांचा गैरसमज करून देत आहेत. अपप्रचार करून विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणले जात असल्याचा आरोप तावडे यांनी केला.

स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक कार्यात इंदिरादेवींचे मोलाचे योगदान

इंदिरादेवी जाधव यांचे सामाजिक आणि स्वातंत्र्य चळवळीसाठीचे योगदान मोठे असून, इंग्रजांकडून जाच होण्याचा धोका पत्करून त्या भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना मदत करीत असत. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या लेखात त्यांच्या कार्याचा सविस्तर उल्लेख आहे. केवळ त्या डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या आई होत्या म्हणून नव्हे, त्यांच्या या सामाजिक योगदानाबाबत त्यांचे नाव या महाविद्यालयास देण्यात आले आहे. नूलसारख्या छोट्या गावात शिक्षणासाठी इतके मोठे प्रयत्न होतात, हे त्या गावातील मुलांचे भाग्यच आहे. ही संस्था मोठी करण्यात संस्थाचालकांचेही मोठे योगदान आहे, असे गौरवोद‍्गार तावडे यांनी काढले.

स्वातंत्र्य लढ्यात इंदिरादेवींचे महनीय कार्यः पालकमंत्री

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्या काळात एखाद्या क्रांतिकारकाकडे बघून कुणी नुसते हसले, तरी इंग्रजांकडून त्रास होत असे. अशा काळात इंदिरादेवींनी स्वातंत्र्य सेनानींना जेवण देण्याचे काम केले, त्यांचे व्यक्‍तिमत्त्व सदैव प्रेरणादायी आहे. राजर्षी शाहू महाराज, ‘पुढारी’चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव यांनी स्वत:कडील सर्व देऊन सामाजिक काम केले. आम्हीदेखील त्याच परंपरेचे पाईक होऊन वाटचाल करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

नूलमध्ये सांस्कृतिक सभागृह उभारणार

नूल येथे सांस्कृतिक सभागृह बांधावे, अशी विनंती दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या भाषणात केली होती. या मागणीवर तीन मजली सांस्कृतिक हॉल बांधला जाईल, अशी घोषणा तत्काळ पालकमंत्री पाटील यांनी केली. ते म्हणाले, आमदार दत्तक ग्राम योजनेत दोन गावांची निवड केली आहे. त्या गावात विकासाचे कोणतेही काम शिल्लक राहिलेले नाही. त्याच धर्तीवर नूल गावात विकासाची कोणती कामे केली पाहिजेत, याचे नियोजन करा. माझ्या आत्याचे हे गाव आहे, त्यामुळे माझेही या गावाशी ऋणानुबंध आहेत. त्यामुळे नूलसाठी जे-जे करावे लागेल, ते-ते केले जाईल. येत्या दोन वर्षांत नूल गावात विकासाचे कोणतेही काम शिल्लक राहणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

सरकारच्या धोरणाने शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचेलः डॉ. प्रतापसिंह जाधव

दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे कालबाह्य अभ्यासक्रम बदलण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी अशी धोरणे ठरवावी लागतील. भारतीय संस्कृती आणि भारतीय शिक्षण पद्धती या देशाला मिळालेल्या दोन मोठ्या देणग्या आहेत. युरोपातील ऑक्सफर्ड, केम्ब्रिज या विद्यापीठांच्या स्थापनेआधीपासून भारतात तक्क्षशिला, नालंदा, विक्रमशिला अशी विद्यापीठे होती. देश स्वातंत्र्यापूर्वी 12 टक्के लोक साक्षर होते, आता 74 टक्के लोक साक्षर आहेत. अजनूही 40 कोटी लोक अशिक्षित आहेत. यामुळे शिक्षण सक्‍तीचे करणे गरजेचे आहे.

भारत बनणार तरुणांचा देश

येत्या बारा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश होणार आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, सुमारे 65 टक्के लोक 35 वयोगटावरील आहेत. यामुळे 2030 मध्ये जगातील चार पदवीधरांपैकी एक भारतातून पदवी घेऊन बाहेर पडलेला असेल. सुमारे 80 कोटी लोक तरुण असल्याने कोणतीही गोष्ट साध्य करण्याची ताकद भारतात निर्माण होणार आहे. यामुळे वर्चस्व गाजवणारे राष्ट्र म्हणून भारत उदयास येईल. याकरिता ग्रामीण भागात अशा शिक्षण संस्था वाढल्या पाहिजेत, त्या संस्थांना सरकारने पाठबळ दिले पाहिजे, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

पाटील यांच्याएवढे काम, कोणत्याच पालकमंत्र्यांनी केले नाही

चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री म्हणून जितके काम केले, ते आजवर कोणत्याच पालकमंत्र्यांनी केले नाही, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, टोलसाठी जनतेने लढा दिला, तो टोल घालवण्यासाठी दादांनी 450 कोटी रुपयांचा निधी दिला. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी 80 कोटी, जोतिबा तीर्थक्षेत्र विकासासाठी 25 कोटी, विमानतळासाठी 82 कोटी, नृसिंहवाडी कन्यागत महापर्वसाठी 70 कोटी, रिंगरोडसाठी 429 कोटी, जिल्ह्यातील रस्त्यांसाठी सुमारे दोन हजार कोटी आदी अनेक कामांसाठी विविध योजनांद्वारे पाटील यांनी जिल्ह्याला सुमारे 4 हजार कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. विकासासाठी जेवढा निधी हवा आहे, तेवढा निधी ते देत असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. 

कॉलेज इमारत इंदिरादेवींचे स्मारक

आ. संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, या शिक्षण संस्थेच्या मागे ‘पुढारी’ परिवाराची शक्‍ती आहे. यामुळे ही संस्था भाग्यवान आहे. इंदिरादेवींच्या रूपाने कर्तबगार महिला या मातीत जन्माला आली, त्यांनी दोन पद्मश्री घडवले, असे गौरवोद‍्गारही यावेळी त्यांनी काढले. माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, कॉलेजची इमारत म्हणजे इंदिरादेवींचे जिवंत स्मारक आहे. ‘पुढारी’ परिवार सामाजिक कार्यासाठी सातत्याने मदत करत आला आहे.

प्रारंभी शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते फित कापून नूतन इमारतीचे थाटात उद्घाटन झाले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते इंदिरादेवी जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. शिक्षण संस्था व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. प्रतापसिंह जाधव यांना मानपत्र देऊन त्यांनी दिलेल्या योगदानाबाबत त्यांचा गौरव करण्यात आला. ‘पुढारी’ परिवाराच्या वतीने डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते कंत्राटदार जयसिंगराव चव्हाण, इंजिनिअर अभिजित चौगुले, संस्थेचे ज्येष्ठ संचालक विनोद नाईकवाडी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, शाखा अभियंता सागर कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्‍वराप्पाण्णा नडगदल्ली यांच्या ‘विद्यादानिश्‍वर’ या जीवनचरित्राचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. विनोद नाईकवाडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुदेश दास यांनी सूत्रसंचालन केले. पी. बी. नांदवडेकर यांनी आभार मानले. 

यावेळी भगवानगिरी महाराज, शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन कल्लाप्पाण्णा नडगदल्ली, सचिव नानाप्पा माळगी, संचालक रामगोंडा पाटील, कृष्णा जाधव, विलास कुलकर्णी, भीमाप्पा मास्तोळी, परशराम कापसे, गंगय्या हिरेमठ, प्राचार्य टी. एम. राजाराम, मुख्याध्यापक जे. डी. वडर, के. एम. गाडे, जी. आर. चोथे, एस. टी. जाधव, सरपंच बाजीराव चव्हाण, उपसरपंच कल्लाप्पा देसाई, माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील, ‘पुढारी’च्या संचालिका सौ. गीतादेवी जाधव, दै.‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या अध्यक्षा सौ. स्मितादेवी जाधव, राजवीर जाधव, तेजराज जाधव, सौ. सुनेत्रा शिंदे, श्रीमती मीनाताई ढोले-पाटील, सौ. दीपा पठाडे, सौ. वैजयंती अतिग्रे, सौ. हेमलता शिर्के, डॉ. दिलीप पठाडे, डॉ. अमेय पठाडे, डॉ. अभय शिर्के, डॉ. रणजित किल्लेदार, डॉ. निकिता किल्लेदार, शशिकांत शिंदे, धीरज शिंदे, प्रशांत शिंदे, अमित शिंदे, समीर शिंदे, तुषार शिंदे, सौ. अरुणा माने, सतीश माने, बाबा लिंग्रस, समीर ढोले-पाटील, सत्यजित मिस्कीन, अजिंक्य शिर्के, कुणाल अतिग्रे, रमेश पोवार, प्रकाश तेलवेकर, शिवाजी तेलवेकर, लता तेलवेकर, अक्षय तेलवेकर, अमरनाथ तेलवेकर, दिलीप तेलवेकर, जि. प. सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर, संत गजानन महाराज शिक्षण समूह अध्यक्ष-अण्णासाहेब चव्हाण, रमेश रेडेकर, राजेश पाटील, अ‍ॅड.सुरेश कुराडे, जे. बी. बारदेस्कर, प्रांताधिकारी संगीता चौगुले, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, शिक्षण उपसंचालक एम. के.गोंधळी, शिक्षणाधिकारी किरण लोहार, किसनराव कुराडे, जितेंद्र शिंदे-कृषी उत्पन्‍न बाजार समिती सदस्य, प्रकाश तेलवेकर, नागेश चौगुले, धोंडिबा शिंदे, अ‍ॅड. शिवाजोराव चव्हाण, अनिता चौगुले जि. प. सदस्या, परशराम सरनाईक, मल्हारराव शिंदे, सुभाष सावंत, रमेश आरबोळे, संग्रामसिंह कुपेकर, गोड साखरचे माजी अध्यक्ष-प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादीचे चंदगड विधानसभेचे अध्यक्ष - बी एन पाटील-मुगळीकर, बाबुराव मदकरी, सागर मांजरे, स्वप्निल चव्हाण, मल्हार शिंदे, संजय रेडेकर, महाबळेश्‍वर चौगुले, जयवंत नगरे, पं. स. सभापती जयश्री तेली, मकरंद कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, सुभाष निकम, सुहास पोतदार, शामराव शिंदे, गटशिक्षण अधिकारी रमेश कोरवी, पांडुरंग आरबोळे, गुरुप्रसाद गुरव, आबासाहेब चव्हाण, प्रा. सुनील शिंत्रे, शंकरराव नंदनवाडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बी. जी. काटे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष-राजेंद्र खोराटे, डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, रवी माळगी, तौशिफ बुढानावर, सुमित चौगुले, गुलाब काझी, सुनीलदत्त जाधव, अमर चव्हाण, गुरगोंडा पाटील, शामराव शिंदे, विजय जाधव, बाळासाहेब तराळ, डॉ. आप्पासाहेब दिवटी, बसवराज आरबोळे, रफिक पटेल, आर. के. चव्हाण, आप्पासाहेब यादव, बाळासाहेब आरबोळे, राकेश शेलार, बाळासाहेब मोहिते, डॉ. दिलीप मांजरेकर, एम. एस. आरबोळे, आप्पासाहेब काळे, प्रशांत पाटील, प्रा. महेश कदम, रावसाहेब शिंदे, रावसाहेब मुरगी, जे. डी. वडर, वाय.