Wed, Jul 24, 2019 08:07होमपेज › Kolhapur › ‘शासकीय’ वीज वापरात होणार 30 टक्के बचत

‘शासकीय’ वीज वापरात होणार 30 टक्के बचत

Published On: Jan 11 2018 1:06AM | Last Updated: Jan 11 2018 12:28AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : सुनील सकटे 

वीज बचतीसाठी शासकीय कार्यालयांत एलईडी बल्ब, ट्युब, फॅन या साहित्याचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. या साधनाद्वारे तब्बल तीस टक्के वीज बचतीचा कृती कार्यक्रम सरकारने आखला आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात असा बदल करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर शहरात 60 हून अधिक कार्यालयांत अशी साधने बसविण्यात आली आहेत. 

शासकीय कार्यालयांत काही वेळा विजेचा अपव्यय होतोच. शिवाय,  वीजबिलांवर पैसे खर्च होत आहेत. यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आता शासकीय कार्यालयांतील वीज वापरावर मर्यादा आणण्याचे धोरण आखले आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन आणि एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (इइसीएल) यांच्या संयुक्‍त विद्यमाने ऊर्जा कार्यक्षम इमारत कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यात सर्व शासकीय इमारतींतील जुने ट्युबलाईट, बल्ब, पंखे बदलून एलईडी बल्ब, ट्युब, फॅन बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. कोल्हापुरातही हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. 

जिल्ह्यातील 222 शासकीय कार्यालयांच्या इमारतींपैकी पहिल्या टप्प्यात 121 इमारतींमध्ये ही साधने बसविण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत 121 पैकी 50 टक्के म्हणजेच साठहून अधिक इमारतींत अशी साधने बसविण्यात आली आहेत. प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस उपअधीक्षक कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य कार्यालयांचा समावेश आहे. 

45 वॅट क्षमतेची नियमित ट्युबलाईटऐवजी आता 20 वॅटची एलइडी ट्युब उपलब्ध आहे. तर, 55 वॅटच्या पंख्याऐवजी एलईडीचा 45 वॅट क्षमतेचा पंखा उपलब्ध आहे. ट्युब आणि पंख्यांच्या माध्यमातून सरासरी 30 टक्के वीज बचत होणार आहे.