होमपेज › Kolhapur › ठसे न उठणार्‍या वृद्ध ग्राहकांसाठी आता शासकीय ‘नॉमिनी’

ठसे न उठणार्‍या वृद्ध ग्राहकांसाठी आता शासकीय ‘नॉमिनी’

Published On: Jul 14 2018 12:21AM | Last Updated: Jul 13 2018 11:48PMकागल : बा. ल. वंदूरकर

अनेक वद्ध, परित्यक्ता महिला तसेच निराधार महिला शहरात फिरून घरोघरी रोजच धुणी-भांडी करून, आपण उपाशीपोटी राहून, मुलांचे पालनपोषण करीत असतात. हे काम करीत असताना सततच्या भांडी घासण्यामुळे त्यांच्या हातातील बोटांचे ठसेच नाहीसे झाले आहेत. बोटांना ठसेच उरले नाहीत. अशा रेशन ग्राहकांना रेशन मिळण्यासाठी येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी  सरकार आता थेट ‘नॉमिनी’ची नियुक्ती करणार आहे 

‘नॉमिनी’च्या माध्यमातून आता धान्य तसेच ठसे न उठल्यामुळे अडली जाणारी पेन्शनही दिली जाणार आहे. बहुतांशी बारा बलुतेदारांच्या काम करणार्‍या महिला आणि पुरुषांच्या हाताला कष्टाची कामे करून रेषाच उरल्या नाहीत. त्यामुळे हाताचे ठसे घेऊन लाभ देण्याच्या शासनाच्या योजना या लाभार्थ्यांसाठी कुचकामी ठरत आहेत. सध्या स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशीन आणि बँकांमधील ठसा उमटविण्यासाठी वापरले जाणार्‍या पॉस मशीनमध्ये हाताच्या बोटाचे ठसे उमटविल्याशिवाय लाभच मिळत नाही. अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचार्‍यांच्या हाताच्या बोटांच्या ठशांचा वापर केल्यानंतर धान्य मिळत आहे.

हाताच्या बोटांच्या रेषा अस्पष्ट झालेल्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानामध्ये रेशन खरेदी करण्याच्या पॉईंट ऑफ सेलवर संबंधितांची ओळख जुळत नाही. ओळख नाही जुळली तर धान्य दिले जात नाही तसेच बँकांमध्ये निराधार पेन्शन काढण्याकरिता गेले असता तेथील मशीनवर ओळख जुळत नाही. यामुळे वृद्धांची तसेच अनेक जणांची पेन्शन व धान्य मिळत नाही.

हाताच्या बोटाचे ठसे उमटत नाहीत, त्यांची ओळख जुळत नाही. अशा वृद्धांना आणि महिला पुरुषांच्या मदतीकरिता शासनाने ‘नॉमिनी’ नियुक्त केलेे आहेत. त्यांच्या आधारे संबंधित लाभार्थ्यांना धान्य पुरवठा केला जात आहे. रास्त भाव दुकानातील ई - पॉस मशीनद्वारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार लिंक झाले तरीदेखील धान्य वितरण करण्यात यावे, आधार लिंक नाही झाले तर ई केवायसी करून धान्य द्यावे. वरील पर्याय शक्य नसल्यास रुट ऑफिसर नॉमिनी यांचे आधार लिंक करून धान्य वितरण करण्यात यावे. कोणत्याही पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात येऊ नये, असे सुचविण्यात आले आहे. यासाठी गावातील नामांकित व्यक्तीच्या खांद्यावर नॉमिनीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ओळख पटवून दिल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना धान्य दिले जाते. गावचे पोलिस पाटील, तलाठी, सर्कल किंवा भेट देणारे शासकीय अधिकारी अशा शासकीय कर्मचार्‍यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावोगावी चांगली सोय झाली आहे.

सध्या अनेक गावांतील पोलिस पाटील पदे रिक्त आहेत, तर ऑनलाईनच्या कामासाठी तलाठी मुख्यालयातच असतात. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदाराला आणि लाभार्थ्यांना या कर्मचार्‍यांची वाट पाहत बसावे लागत आहे.