कोल्हापूर : प्रतिनिधी
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आर्थिक कारणामुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत असून, यासाठी सरकारकडून दरवर्षी २ कोटी विद्यार्थ्यांना विमा संरक्षण दिले जाईल असे विनोद तावडे म्हणाले. गडहिंग्लज तालुक्यातील (कोल्हापूर) नूल या गावातील शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शानदार सोहळ्यास पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आई अथवा वडिलांच्या मृत्युनंतर आर्थिक भार पेलवण्यासारखा नसल्याने अनेक मुलांचे शिक्षणच बंद होते. आता अशी परिस्थती येऊ नये म्हणून विमा योजनेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत केले जाईल असे सांगत तावडे म्हणाले, दरवर्षी २ कोटी विद्यार्थ्यांचा विमा सरकारच्यावतीने काढला जाईल. त्याद्वारे विद्यार्थ्याचा अपघात झाला तरी त्याला नुकसान भरपाई मिळेल, तसेच त्याच्या आई अथवा वडिलांचा मृत्यू झाल्यास पुढच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च विमा कंपनीकडून केला जाईल. याबाबत विविध विमा कंपन्यांशी बोलणी सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांनी बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी अनेक अडचणींचा सामना करून सोयीसुविधा निर्माण केल्या. त्यांचाच आदर्श घेऊन बहुजनांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे, मात्र, त्यातही विरोधकांकडून राजकारण आणले जात असल्याची खंत मंत्र्यांनी व्यक्त केली. फी, भरती तसेच प्रवेश प्रक्रियेचे नियम न बदलता एखादी खाजगी कंपनी शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करत असेल तर त्यात काय चुकीचे आहे, अशी विचारणा करतानाच विरोधक मात्र याचा चुकीचा अर्थ काढून पालकांचा गैरसमज करून देत आहेत. अपप्रचार करून विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणले जात असल्याचा आरोप तावडे यांनी केला.
इंदिरादेवी जाधव यांचे सामाजिक आणि चळवळीसाठीचे योगदान मोठे असून इंग्रजांकडून जाच होण्याचा धोका पत्करून त्या भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना मदत करीत असत. केवळ त्या डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या आई होत्या म्हणून नव्हे, त्यांच्या या सामाजिक योगदानाबाबत त्यांचे नाव या महाविद्यालयास देण्यात आले आहे. नूलसारख्या छोट्या गावात शिक्षणासाठी इतके मोठे प्रयत्न होतात, त्या गावातील मुले भाग्यवानच असतात. ही संस्था मोठी करण्यात संस्थाचालकांचेही मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार तावडे यांनी काढले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्या काळात एकाद्या क्रांतीकारकाकडे बघून कुणी नुसते हसले तरी इंग्रजांकडून त्रास होत असे, अशा काळात इंदिरादेवींनी स्वांतत्र्य सेनानींना जेवण देण्याचे काम केले, त्यांचे व्यक्तीमत्व सदैव प्रेरणादायी आहे. राजर्षी शाहू महाराज, पुढारीचे संस्थापक संपादक डॉ.ग.गो.जाधव यांची स्वत:चे कपडे विकून सामाजिक काम केले, आम्हीदेखील त्याच परंपरेचे पाईक होऊन वाटचाल करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले. करण्याची जी परंपरा होती, त्यावर आम्हीही चालत आहोत असेही पाटील यांनी सांगितले.
Tags : Maharashtra government, Insurance, 2 crore students, educational minister, vinod tavade