कोल्हापूर : प्रतिनिधी
संघटित टोळ्यांच्या वर्चस्ववादातून खुनीहल्ला, गर्दी-मारामारी, अत्याचार, विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यांचे रेकार्ड असलेल्या गौरव अशोक भालकर (वय 28, रा. सरनाईकमाळ, सम्राटनगर) या म्होरक्यासह चार साथीदारांना शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी ही कारवाई केली.
राजारामपुरीसह उपनगरांमध्ये दहशत माजविणार्या आणखी सात सराईत टोळ्यांतील साथीदारांवर तडीपार व दोन टोळ्यांवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाईचे प्रस्ताव वरिष्ठाधिकार्यांकडे दाखल करण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
गौरव भालकरसह त्याचे साथीदार ओंकार विनायक आरगे (23, म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर, तीनबत्ती चौक), नीलेश सुनील कांबळे (21, दौलतनगर, तीनबत्ती चौक), नितीन अर्जुन लोखंडे (24, सम्राटनगर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
भालकरविरुद्ध राजारामपुरीसह अन्य पोलिस ठाण्यांत पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये विनयभंग, खुनाचा प्रयत्न, गर्दी-मारामारी, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून नुकसान केल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. नीलेश कांबळेवर गर्दी-मारामारी, बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. ओंकार आरगेविरुद्ध गर्दी-मारामारीसह 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत, असे सांगण्यात आले.
भालकरसह टोळीतील साथीदारांची दहशत मोडीत काढण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम यांनी पोलिस अधीक्षक मोहिते यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला होता.
राजारामपुरी परिसरातील आणखी सात टोळ्यांतील सराईतांवर तडीपार, तर अन्य दोन टोळ्यांवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाईचे प्रस्ताव पोलिस अधीक्षक व विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे दाखल करण्यात आले आहेत.
Tags : kolhapur city, gourav bhalkar, utlawry