Wed, Jun 26, 2019 12:08होमपेज › Kolhapur › तोडणीअभावी ऊस कर्नाटकाकडे

तोडणीअभावी ऊस कर्नाटकाकडे

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:40AM

बुकमार्क करा
गोरंबे : वार्ताहर

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊस तोडणी मजुरांच्या संख्येत घट झाल्याने, तोडणी कार्यक्रम दोन महिन्यांच्या अंतराने लांबणीवर जात आहे. त्यामुळे करार केलेला ऊस असतानाही तो जिकडे लवकर जाईल त्या कारखान्यास शेतकरी ऊस पाठवण्यास प्राधान्य देत आहेत. यामध्ये कर्नाटकमधील कारखाने संधी साधत आहेत. यामुळेच सध्या  ऊस कर्नाटकाकडे चालला आहे. कागल तालुक्यात चार साखर कारखाने गाळप करीत आहेत. यावर्षी उसाचे उत्पादनही चांगले आहे; पण यंत्रणा मात्र कमी आहे. दिवसेंदिवस बैलगाडींची व छकडींची  संख्याही कमी  झाली  आहे. अपुर्‍या  यंत्रणेमुळे  शेतकर्‍यांना स्वतः तोडणी करून ऊस कारखान्यांना पाठवावा लागत आहे.

खुद्द तोडणीद्वारे ऊस पाठवावा लागत असल्यामुळे एकमेकांचे ऊस तोडण्यासाठी पैरा पद्धतीचाही उपयोग केला जात आहे. वाडे तोडण्यासाठी येणार्‍या तरुणांचाही ऊस तोडण्यासाठी मदत घेतली जात आहे आणि तुटून झालेला ऊस भरण्यासाठी कारखान्यांच्या टोळीला बोलविले जात जाते. अशा पद्धतीने ऊस कारखान्याकडे पाठविला जात आहे. पुढील वर्षापासून ऊस तोडणारी यंत्रणा प्रत्येक कारखान्याने कार्यक्षम पद्धतीने राबविली पाहिजे, तरच ऊस गाळपासाठी वेळेत जाईल आणि शेतकरी नुकसान टळेल; अन्यथा कारखाना प्रशासनाकडे उसाची नोंद करूनही वेळेत ऊस कारखान्यास जात नसल्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करून कर्नाटकातील कारखान्यांना ऊस पाठविण्याची वेळ उत्पादकावर येते.