Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Kolhapur › मराठा संघटनांतर्फे रविवारी गोलमेज परिषद

मराठा संघटनांतर्फे रविवारी गोलमेज परिषद

Published On: Aug 30 2018 1:18AM | Last Updated: Aug 30 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी शिवाजी चौकात सुरू असलेल्या शौर्यपीठाच्या ठिकाणी बैठक घेऊन येत्या रविवारी (दि. 2) शिवाजी मंदिरमध्ये सर्व मराठा संघटना पदाधिकार्‍यांची गोलमेज परिषद घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. दरम्यान,  गुरुवारपासून शौर्यपीठाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे, असे शौर्यपीठाचे कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी सांगितले. 

बुधवारी विविध संघटनांनी शौर्यपीठाला भेट देऊन पाठिंबा व्यक्‍त केला. यामध्ये मराठा क्रांती संघटना, छावा संघटना, मराठा रियासत, हिंदू एकता, राजमाता जिजाऊ ब्रिगेड, शिवक्रांती युवा सेना, राजमुद्रा शेतकरी संघटना, शिवशाहू संघटना, मराठा विकास संघटना, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिग्रेड, मानवाधिकार संघटना आदी संघटनांचा समावेश होता. यानंतर  सुरेश पाटील, माजी आ. सुरेश साळोखे,  रविकिरण इंगवले, राजू सावंत, फत्तेसिंग सावंत, बाळ घाटगे यांनी मनोगत व्यक्‍त केले. 

बैठकीत शहरातील तालीम संस्था, सर्व तरुण मंडळांचे कार्यकर्ते यांची गोलमेज परिषद आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी उदय लाड, राजू जाधव, शिवाजीराव लोंढे, परेश भोसले, लालासो गायकवाड, फिरोजखान अत्तार, जयदीप शेळके, राजेंद्र चव्हाण, प्रकाश सरनाईक  आदी उपस्थित होते. 

आरक्षणासाठी मराठ्यांच्या बाजूने : अशोक चराटी
मराठा समाज हा आर्थिक द‍ृष्ट्या मागासच राहिला आहे. मराठा मुलांमध्ये गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे ही मुले शैक्षणिक क्षेत्रात मागे पडत आहे, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आम्ही सत्तेत जरी असलो तरी आरक्षणाच्या लढ्यात मराठ्यांच्या बाजूने आहोत, असा विश्‍वास आजरा कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी यांनी व्यक्‍त केला.

आजरा तालुक्यातील विविध गावातील सरपंच, नगरपंचायतीचे नगरसेवक, अण्णा भाऊ संस्था समूहाचे पदाधिकारी यांनी बुधवारी दसरा चौकातील सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन पाठिंबा व्यक्‍त केला. यावेळी चराटी यांनी आजरा तालुक्याच्या वतीने पाठिंब्याचे पत्रक वसंतराव मुळीक यांच्याकडे दिले. यावेळी आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. ज्योत्स्ना पाटील (चराटी), आजरा बँकेचे चेअरमन विलास नाईक, आनंदराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.