Mon, Jul 15, 2019 23:39होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’च्या 150 रोजंदारी कर्मचार्‍यांची नोकरी धोक्यात

‘गोकुळ’च्या 150 रोजंदारी कर्मचार्‍यांची नोकरी धोक्यात

Published On: Jul 28 2018 1:33AM | Last Updated: Jul 27 2018 11:27PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) वर्षानुवर्षे रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणार्‍या सुमारे 150 कर्मचार्‍यांची नोकरी धोक्यात आली आहे. या कर्मचार्‍यांना 1 ऑगस्टपासून ब्रेक दिला जाण्याची शक्यता आहे. संघातील नोकरभरतीला विरोध करून प्रसंगी त्याविरोधात न्यायालयात गेलेली कर्मचारी संघटना मात्र शांतच आहे. 

गोकुळमधील अलीकडेच करण्यात आलेली नोकरभरती विविध कारणांनी गाजत असतानाच रोजंदारी कर्मचार्‍यांना कमी करण्याच्या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. ज्यांना कमी करायचे आहे ते कर्मचारी संघात गेल्या 15 ते 16 वर्षांपासून कामावर आहेत. यापैकी एकाने तर 22 वर्षे रोजंदारी कर्मचारी म्हणून काम केले आहे. पण, त्यांना नव्या नियुक्तीत प्रशिक्षणार्थी किंवा अन्य कोणताही ऑर्डर दिलेली नाही. 

संघाकडे सुमारे 600 रोजंदारी कर्मचारी होते. त्यांना अलीकडेच प्रतिदिन 275 रुपये पगार दिला जात होता. यातील 200 ते 250 कर्मचार्‍यांना नव्या भरतीत प्रोबेशन म्हणून प्रति महिना 12 हजार 500 रुपये पगाराच्या ऑर्डर दिल्या आहेत. त्याचबरोबर सुमारे शंभर जणांना दहा हजारांच्या ठोक मानधनावर ठेवण्यात आले आहे. उर्वरित सुमारे 150 कर्मचार्‍यांना मात्र 1 ऑगस्टपासून घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. 

संघातील नोकरभरतीला कर्मचारी संघटनेचा तीव्र विरोध होता. संघाच्या मंजूर आकृतिबंधापेक्षा जास्त कर्मचार्‍यांची भरती करू नये, अशी संघटनेची मागणी होती. पण, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संघटना न्यायालयात गेली. न्यायालयाने या भरतीला स्थगिती दिली होती. अलीकडेच संघटनेशी पगारवाढीचा करार केल्यानंतर न्यायालयातील याचिका मागे घेण्यात आली. त्यामुळे नव्या नोकरभरतीचा मार्ग सुकर झाला. पण, वर्षानुवर्षे संघात काम केलेल्या कर्मचार्‍यांना कमी केले जात असताना हीच संघटना मात्र शांत आहे.