Tue, Jul 23, 2019 11:40होमपेज › Kolhapur › सतेज पाटलांच्या पापाचा घडा भरला

सतेज पाटलांच्या पापाचा घडा भरला

Published On: Dec 07 2017 10:14PM | Last Updated: Dec 07 2017 10:14PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

‘गोकुळ’ हा गरीब उत्पादकांचा गरीब संघ असून तो पाच वर्षांत श्रीमंत उत्पादकांचा श्रीमंत संघ होणार आहे. त्यांनी भरपूर पाप केले आहे. त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. संघावर बोलण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यांच्यातील व आमच्यातील हा संघर्ष असून यातील कोणतरी संपल्यावरच हे राजकारण संपणार असल्याचे उद‍्गार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गुरुवारी काढले.

‘गोकुळ’ दूध संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित निषेध मोर्चा व जागृती मेळाव्यात महाडिक बोलत होते. यावेळी खा. धनंजय महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, आ. सुरेश हाळवणकर, आ. सत्यजित पाटील, बजरंग देसाई, संजय घाटगे, भरमूअण्णा पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील व सर्व संचालक उपस्थित होते.

महाडिक म्हणाले, मंत्री असताना सतेज पाटील यांनी सीपीआर मोडण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी कदमवाडीत हॉस्पिटलची उभारणी केली. मात्र, गोरगरिबांचे हॉस्पिटल बंद पडले नाही. उलट त्यांचेच हॉस्पिटल बंद पडले. या ठिकाणी आता पगाराची माणसे आणून शासनाचे अनुदान लाटले जात आहे. त्यांनी धनगरांची जागा बळकावली. सयाजी हॉटेलमध्ये काय धंदे चालतात, याची सर्वांना कल्पना आहेच; पण या हॉटेलच्या पार्किंगची, शांतीनिकेतनची जागाही अशीच बळकावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्री असताना टोलच्या कामात काय घोटाळा केला, असा सवाल करत थेट पाईपलाईनचे काम संथ गतीने सुरू असून लोकांना कधी पाणी मिळणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

महाडिक-आ. पाटील यांनी ‘गोकुळ’मध्ये राजकारण आणू नये : पी. एन. 

‘गोकुळ’ हा राज्यातीलच नव्हे तर देशातील उत्कृष्ट संघ आहे. लाखो लोकांचे संसार या संघाने फुलवले आहेत. हा संघ टिकला पाहिजे म्हणूनच या संघाचा राजकारणासाठी वापर करू नये, असे आवाहन संघाचे नेते माजी आमदार पी. एन. पाटील यांनी महादेवराव महाडिक व आ. सतेज पाटील यांना केले. 

पाटील म्हणाले, जिल्ह्यात अनेक दूध संघ निघाले आणि अनेक बंद पडले आहेत. या संघांनी दुधाची बिलेही दिलेली नाहीत, अशी स्थिती आहे. मात्र, ‘गोकुळ’ने सर्वसामान्य उत्पादकाला बळकटी दिली. अनेक संसार फुलवण्याचे काम संघाने केले आहे. राज्यातील सहकार खात्याचे अधिकारी, मंत्री संघाला भेटी देतात आणि संघाचे कामकाज चांगले आहे, अशी शाबासकी देतात. एवढ्या उत्कृष्ट संघाची बदनामी करणे त्यावर टीका करणे योग्य नाही. 

गेले दोन महिने ‘गोकुळ’वर आरोप होत आहेत. संघावर काढलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांनी संस्था काढल्या; पण त्यांना त्या उभ्या करता आल्या नाहीत. त्या लोकांनी ‘गोकुळ’ला कारभार शिकवू नये, असा टोला पाटील यांनी लावला.

संघाला 60 टक्के गायीचे दूध येत आहे. या दुधाला खप नाही तरीही उत्पादकाला अडचण येऊ नये म्हणून संघ हे दूध स्वीकारत आहे. राज्यातील कोणत्याही दूध संघापेक्षा गायीच्या दुधाचा खरेदी दर जास्त आहे. असे असतानाही संघावर टीका करणे योग्य नाही. उत्पादकाच्या हितासाठी महादेवराव महाडिक यांनी टीकेकडे दुर्लक्ष करावे आणि आ. सतेज पाटील यांनी सर्वसामान्यांना आधार देणार्‍या संस्थेला बाधा येऊ नये, असे राजकारणाचे धोरण आखू नये, असे आवाहन त्यांनी केले. 

आ. पाटील यांनी सबुरीने घ्यावे : खा. महाडिक

महाडिक-पाटील यांच्यातील वादासाठी वेगळे व्यासपीठ आहे. त्यासाठी निवडणुका आहेत. मात्र, आपल्या वादासाठी ‘गोकुळ’ला बदनाम करू नका. आपल्या वैरत्वासाठी साडेपाच लाख लोकांच्या चुलीत पाणी ओतू नका. माझी पाटील यांना विनंती आणि आवाहन आहे की, राजकारणात कोणीही कोणाचे कायमचे शत्रू नसते आणि मित्रही नसतात. म्हणून त्यांनी थोडे सबुरीने घ्यावे, असे आवाहन खा. धनंजय महाडिक यांनी केले.

आ. पाटील हे संघाची बदनामी करत आहेत. संघाबाबत गैरसमज पसरवत आहेत. संघाची बदनामी करून त्यांना आपली पोळी भाजायची आहे. ‘गोकुळ’चा आंबा त्यांना पाडायचा आहे. यासाठी ते लोकांना एकत्र करून, गट बांधणी करायची, लायकी नसणार्‍यांच्या माध्यमातून ‘गोकुळ’वर टीका करत सुटल्याचे ते म्हणाले. संघाला वाचवण्याची ते धडपड करत असल्याचे सांगत आहेत; पण ‘गोकुळ’ संघ अत्यंत चांगल्या पद्धतीने चालला आहे. उलट यांच्यासारख्या करंट्यांनी बदनामी केल्यानेच जिल्ह्यातील अनेक संघ व सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. त्यात गोरगरिबांचे करोडो रुपये अडकले आहेत. त्यावर आ. पाटील काही बोलत नाहीत, अशी टीका खा. महाडिक यांनी केली. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दूध संघ काढा

आ. पाटील यांची परिस्थिती चांगली आहे. पैशाने मोठे आहेत. एवढे पैसे आहेत तर त्यांनी एखादा दूध संघ काढावा, यासाठी लागेल ती मदत करू, अशी कोपरखळी खा. महाडिक यांनी मारली. त्यांनी राजारामच्या स्पर्धेत बावड्याला कारखाना काढला. तसेच आता दूध संघ काढावा, असेही त्यांनी सुचवले. ‘गोकुळ’ चेअरमन विश्‍वास पाटील म्हणाले, संघाला बदनाम करण्याचे विरोधकांचे षड्यंत्र आहे. ‘गोकुळ’वर बोलल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नसल्याने ते खोटेनाटे आरोप करत आहेत. मात्र, सभासदांना ‘गोकुळ’ची किमया माहिती असल्याने ते या टीकेकडे लक्ष देणार नाहीत. 

अरुण डोंगळे म्हणाले, ‘गोकुळ’मध्ये प्रत्येकालाच श्रीकृष्ण व्हायचे आहे. मात्र, निवडणुकीसाठी आणखी दोन वर्षे आहेत. त्या मैदानात त्यांनी लढावे त्यास आमची काही हरकत नाही; पण संघावर टीका करू नये. ज्या संघाचे आपण दूध पितो, त्याची जाणीव तरी ठेवा.

रणजितसिंह पाटील म्हणाले, जिल्ह्याचा पालनपोषणकर्ता ‘गोकुळ’ संघ आहे. हा संघ चांगला चालला असतानाही यावर टीका करत आहात. जर तुम्हाला शेतकर्‍यांची काळजी आहे, तर तुमच्या कारखान्याचा उसाचा दर इतर कारखान्यापेक्षा कमी का?

आयडीएचे अध्यक्ष अरुण नरके म्हणाले, जगातच दुधाच्या उद्योगावर संकट आले आहे. असे असताना राज्य सरकारने गायीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा होता. कोणाला तरी खूश करण्यासाठी हा निर्णय घेतला. त्यामुळे हा प्रश्‍न चिघळला. सरकार दळभद्री असल्याने अभ्यास न करता दूध दराचा निर्णय झाला. दुधाच्या दराबाबत सरकारला धडा शिकवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. धैर्यशील देसाई म्हणाले, मंत्री असताना सतेज पाटील यांनी काय दिवे लावले, याची सर्वांना कल्पना आहे. त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नासवली असून आता ‘गोकुळ’ दूध संघ नासवण्याच्या तयारीत आहेत.

शिणोळी येथील एम. एन. पाटील म्हणाले, ‘गोकुळ’ निवडणुकीत दोन, तीनवेळा यश मिळाले नसताना पुन्हा पाटील यांनी कोडगेपणा करण्याची गरज नाही. संघाची नाहक बदनामी करू नये, असे आवाहन भगवान लोंढे सांगरूळ यांनी केले. सदाशिव निकम, संजय सावंत, सौ. वंदना भोसले, धनश्री पाटील, के. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले.

मीही व्यापारी : खा. महाडिक
आ. पाटील हे ‘गोकुळ’ला व्यापार्‍यापासून वाचवा म्हणत आहेत. व्यापार्‍याची भूमिका काय असते, असे विचारत आपणही एक उद्योगपती, व्यापारी असल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले. माझा व्यवसाय  चांगला चालेल, चांगला फायदा मिळेल, काटकसरीनेच चालवणार, ही भूमिका असते. यात गैर काय, असा सवाल त्यांनी केला.

काम करूनही टीका होत असल्याची खंत
मी खूप काम करतो. कोकण रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, बास्केट ब्रीज, सिंचन प्रकल्प, पासपोर्ट कार्यालय असे अनेक प्रश्‍न मी मार्गी लावले. कोल्हापूरचे अनेक प्रश्‍न मी सोडवले. तरीही सतेज पाटील हे माझ्यावर वाईट पद्धतीने टीका करतात. याचे मला वाईट वाटते, अशी खंत खा. धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवली.  

पी. एन. यांच्यावर ‘यांनी’च बेवड केला : महाडिक
पी. एन. पाटील यांनी ‘गोकुळ’ची भूमिका जाहीर करावी, असे ते म्हणत आहेत. आता सभेत पी. एन. यांनी ‘गोकुळ’बाबतची भूमिका जाहीर केली असल्याने आता त्यांचे काय राहिले, असा प्रश्‍न महादेवराव महाडिक यांनी केला. पी. एन. यांच्यावर त्यांनी खूप बेवड केला आहे. त्यामुळे मतदार संघातील मतदारांनी याची नोंद घ्यावी, असा सल्‍लाही महाडिक यांनी दिला.

वॉटरपार्कची जागा माझ्या पाया पडून घेतली
सतेज पाटील स्वार्थी राजकारणी आहेत. महापालिकेत जेव्हा आमची सत्ता होती, तेव्हा वॉटर पार्कच्या जागेसाठी तो माझ्या पाया पडला होता. तसेच शाहूपुरीच्या कार्यालयात माझ्या गाडीचे दरवाजे तो उघडत होता. हे पटत नसेल तर त्याचे आपणाकडे फोटोही असल्याचे सांगून मदतीची तो जाणीव ठेवत नाही, अशी टीका महादेवराव महाडिक यांनी केली.

वडीलधार्‍यांवरील टीका खपवून घेणार नाही
आ. सतेज पाटील हे लोकांची अवहेलना करतात, नेत्यांवर टीका करतात. मात्र, पुढील काळात संघाची आणि महादेवराव महाडिक यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही. महादेवराव महाडिक हे आ. अमल महाडिक यांचे वडील आणि माझे चुलते आहेत. ते वडीलधारे आहेत. असे असताना कधी त्यांच्यावर 1968 साली रेड झाली, 69 साली असे झाले, असे सांगून ते दिशाभूल करत आहेत. महाडिक यांचा जन्म नव्हता तेव्हाच्या कॅसेट वाजवल्या जात आहेत. म्हणूनच त्यांनी आता वडीलधार्‍यांवर बोलू नये. जर आम्ही तुमच्या वडिलांवर बोललो तर ते तुम्हाला सहन होईल का, याचा त्यांनी विचार करावा, असे आवाहन महाडिक यांनी केले.

मी ट्रॅक्टर आणि ही रोल्स रॉईस
आ. पाटील यांना परमेश्‍वराने चांगले वैभव, ऐश्‍वर्य दिले आहे. संपत्ती दिली आहे. लहानपणी आमदार, मंत्री केले आहे. त्यामुळेच हे बाळ थोडेसे बिघडले आहे. गेल्या पाच-दहा वर्षांच्या काळात जेव्हा जेव्हा त्यांनी तोंड उघडले तेव्हा त्यातून घाणच बाहेर पडली. असे सांगून खा. महाडिक म्हणाले, मला त्यांनी जत्रेतल्या ट्रॅक्टरची उपमा दिली. ज्या खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला, देशात 792 खासदारांत  जास्त प्रश्‍न विचारणारा मी खासदार आहे. असे असताना मी ट्रॅक्टर आणि ही रोल्स रॉईस!

लगीनसुद्धा विचारून करायला लागलं असतं!
विरोधकांच्या हातात दूध संघ गेला नसल्याने सभासद भाग्यवान आहेत. अन्यथा सतेज पाटील यांनी सर्व सुपरवायझर बावड्याचे नेमले असते. तसेच ग्रामपंचायत, दूध संस्था, सोसायटी निवडणूक मला विचारल्याशिवाय लढायची नाही, एवढेच काय लगीनसुध्दा मला विचारल्याशिवाय करायचे नाही, असा आदेश आला असता, असे  खा. महाडिक यांनी सांगताच एकच हशा पिकला.

100 टँकर कोणाचे?
विरोधक दरवेळी ‘गोकुळ’मधील 100 टँकर कोणाच्या मालकीचे आहेत, असा प्रश्‍न करत आहेत. मात्र, ‘गोकुळ’मधील एकही टँकर महादेवराव महाडिक यांच्या मालकीचा नसल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले. महाडिक यांचा ट्रान्स्पोर्ट आहे. यात गोरगरीब कार्यकर्त्यांच्या गाड्या आहेत. असे असताना त्यांना या टँकरची पोटदुखी का, असा प्रश्‍न महाडिक यांनी केला. 

शेण आणले नाही म्हणून बरं
संघावर टीका करणार्‍यांनी पुढील काळात सावधान रहावे. मोर्चाला यावेळी रिकाम्या हाताने आलेल्या महिला पुढीलवेळी शेण घेऊन आल्या तर अडचण होईल, असे टोला अरुण डोंगळे यांनी लावला. 

आपणही हेलिकॉप्टर घेऊ शकतो
खा. धनंजय महाडिक म्हणाले, आ. सतेज पाटील हे श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे रोल्स रॉईस, दोन-तीन हेलिकॉप्टर आहेत. यावर महादेवराव महाडिक म्हणाले, आपणही काही कमी नाही. आपणही एक नव्हे दोन, तीन हेलिकॉप्टर घेऊ शकतो; पण ते करायचे नाही. आम्ही गरिबीतून आलो असून आम्हाला त्याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा : गोकुळमध्ये महाडिक कुटुंबीयांचे २४ टँकर : सतेज पाटील