होमपेज › Kolhapur › आर्थिक सत्ता ताब्यात राहण्यासाठीच खटाटोप

आर्थिक सत्ता ताब्यात राहण्यासाठीच खटाटोप

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 1:33AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेले कोल्हापूर जिल्हा दूध संघासारखी (गोकुळ) संस्था ताब्यात ठेवण्यासाठीच मल्टिस्टेटचा खटाटोप सुरू आहे. याला होणारा विरोधही याचाच एक भाग आहे. ‘गोकुळ’च्या गत निवडणुकीत सत्ताधार्‍यांना घाम फुटला, त्यांच्या दोन जागा पराभूत झाल्यामुळे आगामी निवडणुकीत काहीही होऊ शकते. म्हणूनच मल्टिस्टेटची टूम काढली आहे. 

गोकुळ मल्टिस्टेट झाला, तर सभासदांचे हक्‍क, त्यांना मिळणार्‍या सुविधा याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहेत. वस्तुस्थिती उत्पादक थेट संघाचा सभासद नसल्याने यावर काही परिणाम होण्याची शक्यता नाही. कर्नाटक व सांगलीतून पूर्वी बाहेरचे म्हणून दूध येत होते, ते आता सभासदांचे म्हणून स्वीकारले जाईल. संघ मल्टिस्टेट झाल्यानंतर राज्याचे कायदे लागू होणार नाहीत. आगामी  निवडणुकीत राज्यात सत्ता बदल झाला तर नोकरभरती, गैरव्यवहार यावरून सरकारचा हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे, निवडणुकीची तारीख, त्यासाठी अधिकारी ठरवण्यापासून ते कार्यकारी संचालक नियुक्‍तीचे अधिकारही संघाकडेच राहणार आहेत. 

गत निवडणुकीत आ. सतेज पाटील यांनी सत्ताधार्‍यांना घाम फोडला होता. त्यावेळी आ. हसन मुश्रीफ सत्ताधारर्‍यांसोबत होते. आता मुश्रीफही सत्ताधार्‍यांच्या विरोधात आहेत. महाराष्ट्र सहकार अधिकनियमानुसार संघाच्या निवडणुकीपूर्वी तीन वर्षे सभासद झालेल्या संस्था मतदार म्हणून पात्र आहेत. मल्टिस्टेट संघ झाला तर ही अटही राहत नाही. ज्येष्ठ  संचालक अरुण नरके हे यापूर्वीच मी तुमच्यासोबत पाच वर्षेच राहणार, अशी कमिटमेंट दिल्याचे सांगत आहेत. तोपर्यंत कर्नाटक, सांगलीच्या संस्थांना सभासद करून संघ ताब्यात ठेवण्यासाठी मल्टिस्टेटचे प्रयत्न सुरू आहे.  वाढीव कार्यक्षेत्रासाठी संचालक मंडळात जागा राखीव ठेवण्याची अट नाही. एका तालुक्यातील सर्व संचालकही घेता येतात. हे संचालक, संस्थांना पटवून दिले जात आहे. काही साखर कारखाने मल्टिस्टेट आहेत.‘गोकुळ’ची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटी रुपयांची असून ती चार साखर कारखान्यांच्या उलाढालीपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात शाहू-कागल, दत्त-शिरोळ, जवाहर-हुपरी, पंचगंगा-इचलकरंजी, दौलत-हलकर्णी हे साखर कारखाने मल्टिस्टेट आहेत. यापैकी शाहूमध्ये कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील हे मल्टिस्टेट होण्यापूर्वीच कारखान्याचे संचालक आहेत.