Fri, Jul 19, 2019 18:14होमपेज › Kolhapur › ‘कोल्हापूर रन’ला उदंड प्रतिसाद

‘कोल्हापूर रन’ला उदंड प्रतिसाद

Published On: Feb 10 2018 1:31AM | Last Updated: Feb 10 2018 12:16AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडानगरी कोल्हापुरात 11 फेब्रुवारी रोजी होणार्‍या “हिट 24 ग्रुप प्रेझेंटस् डीवायपी रग्गेडियन कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन 2018’’ ची तयारी पूर्ण झाली आहे. दैनिक ‘पुढारी’ मॅरेथॉनचे असोसिएट पार्टनर तर टोमॅटो एफएम रेडिओ पार्टनर आहेत. 

देश-विदेशातील सुमारे 12 हजारांहून अधिक अबालवृद्ध मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यात खेळाडू, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार-उद्योजक-व्यावसायिक, महिला व ज्येष्ठ नागरिक आदींसह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. अनेकजण सहकुटुंब-मित्र परिवारासह मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी खेळाडूंच्या फिटनेससाठी आयोजित ‘हेल्थ एक्सपो’ या विशेष उपक्रमात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

हिट 24 ग्रुप प्रेझेटिंग पार्टनर तर  डीवायपी गु्रप 
टायटल स्पॉन्सरर आहेत. विद्याप्रबोधिनीच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. कॉसमॉस बँक गोल्ड स्पॉन्सर, फॉर्च्युन शहा गु्रप व जे. के. ग्रुप व्हेंचर सिल्व्हर स्पॉन्सर,  हॉट फ्रायडे टॉक्स लाईफ स्टाईल पार्टनर, इन्स्टिंक्ट मीडिया डिजीटल पार्टनर, हॉटेल थ्री लिव्ह हॉस्पिटॅलिटी पार्टनर, डॉक ऑन लाईन हेल्थ पार्टनर, कोंडूसकर ट्रॅव्हल पार्टनर आहेत. कोल्हापूर मनपाच्या विशेष सहकार्याने ही मॅरेथॉन होत आहे.

नोंदणी प्रक्रिया बंद
मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे मोठा  सहभाग नोंदविला. तब्बल 12 हजारांहून अधिक अबालवृद्धांनी मॅरेथॉनसाठी नोंदणी केली. यामुळे संयोजकांनी नोंदणी प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी होणार्‍या ‘कोल्हापूर रन’ मॅरेथॉनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.   

हेल्थ एक्सपोतून फिटनेसचा मंत्र
दरम्यान, खेळाडूंच्या फिटनेससाठी शुक्रवारी रग्गेडियन क्लबतर्फे हेल्थ एक्सपोचे आयोजन करण्यात आले होते. सेंट झेवियर्स हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हा उपक्रम झाला. यात खेळाडूंना आवश्यक व्यायाम, आहार, योगा, प्रथमोपचार अशा इत्यंभूत माहितीचा समावेश होता. यावेळी ‘जर्नी रॉबीनहूड आर्मी’ (रॉबीन हुड आर्मी प्रतिनिधी), इंज्युरी प्रिव्हेंशन अ‍ॅण्ड इंज्युरी व टेक्निक्स इन फिजिओथेरपी (डॉ. प्रांजली धामणे), बेसिक लाईफ सपोर्ट (डॉ. किरण भिंगार्डे), ‘इंम्पॉर्टन्स ऑफ डाएट फॉर एनर्जेटीक परफॉर्मन्स’ (शिल्पा जाधव), 1000 माईल जर्नी अ‍ॅक्रॉस द मंगोलियन गोबी डेसर्च (सुचेता कड्थनकर) यांनी मार्गदर्शन केले. उपक्रमातून खेळाडूंना फिटनेसचा मंत्र साध्य केला. विविध खेळांसह, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले. अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हीटीअंतर्गत झिप लायनिंग, स्विमिंग, झॉरबिंग, रॅपलिंग यासह डान्स परफॉर्मन्स, म्युझिक, फॅशन शो आदी उपक्रमांना भरघोस प्रतिसाद लाभला.  याशिवाय विविध खाद्य पदार्थ व उत्पादनांच्या स्टॉलसनी हा एक्सपो परिपूर्ण होता. 

मॅरेथॉनची ठळक वैशिष्ट्येे
रग्गेडियन कोल्हापूर रन भारतातील सर्वात पहिली ऑन सिटी रोड अल्ट्रा मॅरेथॉन आहे. कोल्हापुरातील सर्वात मोठी मॅरेथॉन असून देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात यात स्पर्धक सहभागी होणार आहेत.  भारतातील एकमेव मॅरेथॉन ज्यांचे सर्व पेसर हे आयर्नमॅन फिनिशर्स आहेत. कोल्हापुरात पहिल्यांदाच टाईम चीप तंत्रज्ञान, फिनिशर्स मेडल, ऑन रुट मनोरंजन, पेसरची संकल्पना, एक्सपो, अ‍ॅम्बॅसेडोर संकल्पना, ऑनलाईन नोंदणी यासारख्या संकल्पना रग्गेडियनने आणल्या आहेत.

मॅरेथॉन मार्गावर सांस्कृतिक कार्यक्रम
खेळाबरोबरच करमणुकीच्या कार्यक्रमांच्या विविधतेने कोल्हापूर रन मॅरेथॉन परिपूर्ण बनली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जमणार्‍या हजारो क्रीडाप्रेमींच्या करमणुकीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रग्गेडियन क्लबतर्फे करण्यात आले आहे.  

मॅरेथॉन 50 कि.मी. 42 कि.मी. 21 कि.मी., 10 कि.मी. आणि 5 कि.मी. अशा विविध अंतराची असणार आहे. मॅरेथॉनचा स्टार्टिंग पॉईंट सेंट झेवियर्स हायस्कूल आहे. तेथून सुरू होणारी मॅरेथॉन पोलिस मैदान चौक-धैर्यप्रसाद हॉल चौक - सर्किट हाऊस - लाईन बझारपासून पुन्हा फिरून सर्किट हाऊस - धैर्यप्रसाद चौक - ताराराणी चौक (कावळा नाका) - डीवायपी सीटी मॉल - उड्डाणपूल मार्गे - शिवाजी विद्यापीठ- शाहू नाकामार्गे पुन्हा परतीच्या मार्गावरून सेंट झेवियर्स (स्टार्टिंग पॉईंट) या मार्गावरून धावणार आहे. या मार्गावर ठिकठिकाणी 
सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत पाहायला मिळणार आहे. यात लाईव्ह डी.जे., झांजपथक, भरतनाट्यम, शिवकालीन युद्धकला (मर्दानी खेळ), ढोलपथक, झुंबा, आतषबाजीचा समावेश असणार आहे.

वाहतूक मार्गात बदल...
रविवारी होणार्‍या रग्गेडियन मॅरेथॉन स्पर्धेसाठी पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. स्पर्धा सेंट झेविअर्स हायस्कूल- रमणमळा चौक - पितळी गणपती चौक - सर्किट हाऊस - ताराराणी चौक - कोयास्को चौक - शाहू नाका मार्गावर होणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने पर्यायी मार्ग उपलब्ध केले आहेत.  पर्यायी मार्ग : 1) पितळी गणपती चौक ते रमणमळा पोस्ट ऑफिस मार्गावरून येणार्‍या वाहनधारकांनी पोलिस मुख्यालय चौक ते पितळी गणपती चौक मार्गाचा अवलंब करावा. 2) कसबा बावडा ते लाईन बझार मार्गावरून येणारी वाहने पोलिस मुख्यालय चौकातून पितळी गणपती चौकाकडे वळविण्यात येतील.3) तावडे हॉटेलकडून शहरात येणारी वाहने लिशा हॉटेल येथून वळवून रेल्वे उड्डाण पुलाखालून जातील. 4) सरनोबतवाडीकडून येणार्‍या वाहनांना शिवाजी विद्यापीठकडे जाता येणार नाही त्यांनी तावडे हॉटेलमार्गे शहरात यावे. 5) शियेमार्गे कसबा बावड्यातून शहरात येणार्‍या वाहनधारकांनी तावडे हॉटेलमार्गे मार्गस्थ व्हावे.  एका बाजूने वळविण्यात आलेले मार्ग : 1) पोस्ट ऑफिस ते महावीर कॉलेज. 2) पितळी गणपती ते मेनन आयलँड चौक. 3) मेनन आयलँड ते लाईन बझार चौक, 4) मेनन आयलँड ते शाहू नाका.   पार्किंग सुविधा : स्पर्धेसाठी येणारे स्पर्धक, संयोजकांनी आपली वाहने सेंट झेविअर्स शाळेजवळील मेरी वेदर मैदानावर उभी करावीत, असे आवाहन पोलिसांच्यावतीने पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

रग्गेडियन एक्सलन्सी पुरस्कारांचे आज वितरण
शनिवारी (दि. 10) सायंकाळी 6 वाजता सेंट झेवियर्स मैदानावर रग्गेडियन क्लबच्या ‘हेल्थ एक्सपो’अंतर्गत  ‘रग्गेडियन एक्सलन्सी’ पुरस्काराचे वितरण होणार आहे. समाजातील विविध क्षेत्रांत यशस्वी कामगिरी करणार्‍या लोकांना या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, ऋतुराज पाटील आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारच्या सत्रात खेळाडूंसाठी विविध मार्गदर्शक उपक्रम होणार आहेत. यात  दुपारी 12.30 - मिलिट्री, 2.30 - आय अ‍ॅम पॉसिबल (पंकज रवालू), दुपारी 3 - पोटेंशियल पब्लिक हेल्थ विथ होमिओपथी (डॉ. श्रुती संकपाळ-पेडणेकर), 3.30 - बॉडी मॅपिंग अँड रोड मॅप टू कॉम्रेड (डॉ. आनंद पाटील), 4.30 - एव्हरेस्ट जर्नी सर्व्हायव्हल टू समिटर (सुहेल शर्मा) यांचा समावेश असणार आहे.